शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (21:37 IST)

शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल मातोश्रीवर जाऊन विकायचा काय : नारायण राणे

"शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि फायद्याच्या बाबी कृषी कायद्यांमध्ये आहेत. शेतीमाल विकण्यासंदर्भातील बाबींचा समावेश त्यात केला आहे. त्याला महाआघाडीचा विरोध असेल तर, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल मातोश्रीवर जाऊन विकायचा काय", असा सवाल करत भाजपचे खासदार नारायण राणेंनीउद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 
 
नारायण राणे पुढे म्हणाले की, "शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचं ठाकरे सरकारने जाहीर केले होते. मात्र, कुठे गेले ते ५० हजार रुपये? खरंतर ठाकरे सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही, म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत. त्यांनी बाहेर पडावं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं काम करावं. यापूर्वी कृषी कायद्यांच्या बाजूने शरद पवार होते. आता कायद्याच्या विरोधात ते उतरत आहेत. भाजपने केलेल्या कृषी कायद्यांवर शेतकरी खूश आहेत", असा दावा नारायण राणेंनी केला आहे. 
 
औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची पूर्तता शिवसेनेला करता आलेली नाही. आमच्या वेळची शिवसेना वेगळी होती. आताची वेगळी आहे", असे मत नारायण राणेंनी व्यक्त केले.