सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 6 डिसेंबर 2021 (15:33 IST)

देवेंद्र फडणवीसांमुळे मी केंद्रात मंत्री : नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेला उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा होतो, पण व्हाया देवेंद्र फडणवीस असा आहे. दिल्लीत जा असा आदेश त्यांनी दिला. आम्ही आदेश पाळतो. दिल्लीत आता मी सुखी आहे. महिन्याला पुण्यात येणार माणूस चार महिन्यांनी पुण्यात आला, तुमच्या माझ्यातल अंतर यांनी वाढवलं याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहेत, असं नारायण राणे म्हणाले. हातातलं घड्याळ बीजेपीचं नाही, राष्ट्रवादीच आहे, त्यामुळे आता थांबायला हवं, पुढे कार्यक्रम आहेत, असं नारायण राणे म्हणाले.
 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो, असं नारायण राणे म्हणाले. आजचा दिवस हा महत्वाचा आहे, हा कार्यक्रम भावनिक आहे, कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. अनेक जण असे म्युझियम बनवतात, बाबासाहेब यांचं नाव सांगून, अनेक गोष्टी तिथं ठेवतात पण त्या सगळ्या खऱ्या असतात असं नाही, पण इथल्या म्युझियम मधल्या वस्तू खऱ्या आहेत. डॉ. बाबासाहेब इथं जन्माला आले याचा अभिमान वाटतो. आज देशाला बाबासाहेबांसारख्या नागरिकांची गरज आहे, असं नारायण राणे म्हणाले
 
बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात जे काम केलं, घटना लिहिलं त्या घटनेच कौतुक सगळीकडे होतय. मराठा आरक्षणाबद्दल खुप आंदोलन झाली, विरोधकांनीही खुप टीका केली, म्हणे हे आरक्षण घटनेत बसत नाही. मग तज्ञांनी उत्तर दिलं घटनेच्या कलम १५/४ प्रमाणे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहेत बाबासाहेबांच्या विचारांच अनुकरण करा, असं नारायण राणे म्हणाले. आत्मनिर्भर होण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक एक गुण आत्मसात केला तर अमेरिका आणि चीननंतर आपला देश महासत्ता होणार असल्याचं नारायण राणे म्हणाले.
 
मिलिंद नार्वेकर नवीन शिवसेना प्रमुख आहेत का?, राणेंची खोचक टीका
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी पतनाच्या स्मृती जागवल्या आहेत त्यांनी शिवसैनिकांच्या बलिदानाला कोटी कोटी नमन असे ट्विट केलं आहे. यावरुन नारायण राणे यांनी प्रश्न करत नार्वेकरांवर खोचक टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर नवे शिवसेना प्रमुख आहेत का? असे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.
 
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी फडणवीसांना नार्वेकरांनी शिवसैनिकांना बाबरी पतनातील बलिदानाला कोटी कोटी नमन केलं असल्याचे सांगितले आहे. यावर नारायण राणे यांनी उत्तरात मिलिंद नार्वेकर काय नवे शिवसेना प्रमुख आहेत का? असा खोचक सवाल करत टीका केली आहे. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि देवेंद्र फडणवीस देखील हसू लागले.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचा ट्विट योग्य असून त्यात काय चूक आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. बूथ प्रमुखांची बैठक सगळ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये घेत आहोत. यामध्ये प्रशिक्षण, पक्षाचा विचार आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
 
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत शिवसैनिकांच्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम केले आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मस्जिद पतानाचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोवर अयोध्येच्या राम मंदिर निर्मितीसाठी शिवसैनिकांनी दिलेल्या बलिदानाला कोटी कोटी नमन असा मजकूर लिहिला आहे. नार्वेकरांच्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.