गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (20:54 IST)

जावयाच्या मारहाणीत उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू

Father in laws death
जावयाने पोटात चाकूचे वार केल्यामुळे जखमी झालेल्या सासऱ्याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की दि. 4 ऑक्टोबर रोजी संशयित देवानंद सखाराम कांबळे (वय 45, रा. हिंगोली) हा त्याच्या सासरी आला होता. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक भांडण होत असल्यामुळे त्याची पत्नी सातपूर येथील तिच्या माहेरी गेल्या दोन वर्षांपासून राहत होती.
 
या गोष्टीचा राग मनात धरून देवानंद कांबळे याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी देवानंदचे सासरे दिलीप सखाराम वाठोरे हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले. यामुळे संतापलेल्या देवानंदने दिलीप वाठोरे यांच्या पोटावर धारदार चाकूने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. उपचारासाठी वाठोरे यांना नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र आज उपचारादरम्यान वाठोरे यांचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी सातपूर पोलिसांनी पंचनामा केला असून, जावयावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, जावई घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर त्याने हिंगोलीत त्याच्या घरी जाऊन विषप्राशन केल्याचे समजते. अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor