क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऑनलाईन गंडा
नाशिक: बँकेचे क्रेडिट कार्ड ॲक्टीव्हेट करण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमाने सुमारे 4 लाख 63 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुचनय सूचित चॅटर्जी (वय 40) हे खुटवडनगरमधील चाणक्यनगर येथे राहतात. ते दि. 19 ते 20 ऑक्टोबरदरम्यान कॉलेज रोड येथे गेले होते. त्यावेळी त्यांना 18604195555, तसेच 7479039814 या दोन मोबाईल क्रमांकांवरून दोन अनोळखी इसमांनी चॅटर्जी यांना फोन केला व त्यांना बँकेचे क्रेडिट कार्ड ॲक्टीव्हेट करण्याचा बहाणा केला. त्यावेळी आरोपींनी चॅटर्जी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या क्रेडीट कार्डाचा व्हेरिफिकेशन कोड घेतला.
त्यानंतर वारंवार बँकेचे मोबाईल ॲप्लिकेशन लॉग इन व लॉग आऊट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे चॅटर्जी यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशनचा वापर केला असता अज्ञात फोनधारकांनी चॅटर्जी यांच्या बँकेच्या खात्यातून 4 लाख 63 हजार 480 रुपयांची रक्कम काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर चॅटर्जी यांनी सायबर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.
Edited by- Ratnadeep Ranshoor