शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (10:06 IST)

गणपती : इथं एकाच मंडपात बसतात मुस्लिमांचे पीर आणि हिंदूंचा गणपती

स्वाती पाटील
कोल्हापुरातील बाबूजमाल दर्ग्यावर गणेशाची मूर्ती आहे. इथं हिंदू-मुस्लीम एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करतात. ऐक्याचं प्रतीक म्हणून याकडं बघितलं जातं.
 
हजरत पीर शहाजमाल कलंदर म्हणजे बाबूजमाल कलंदर हा कोल्हापूरमधला प्रसिद्ध दर्गा. हा दर्गा सुमारे 900 ते 950 वर्षं इतका जुना आहे.
 
या दर्ग्याचा इतिहासाबाबत असं सांगितलं जातं की, हजरत पीर शहाजमाल कलंदर हे मूळचे बगदाद इथल्या करबलाचे होते.
 
गुरूंच्या आज्ञेवरुन ते काही काळ दिल्लीत राहून मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज इथं राहायला आले. त्या काळी कोल्हापूरमध्ये जैन राजवट होती.
 
बाबू हे हजरत पीर बाबा यांचे शिष्य होते. पुढे बाबूचा दफनविधी हजरत पीर शाहजमाल यांच्या तुरबती शेजारीच केला गेला. तेव्हापासून हा दर्गा बाबूजमाल दर्गा या नावानं ओळखला जातो.
 
बाबूजमाल दर्ग्यावर का आहे गणेशाची मूर्ती?
बाबूजमाल दर्ग्याची कमान ही आदिलशहाने बांधली होती. त्या काळी दक्षिणेवर 3 वेळा स्वारी करूनही पेशव्यांच्या पदरात अपयश आलं होतं. कर्नाटकवर स्वारी करायला निघालेल्या श्रीमंत पेशव्यांनी कोल्हापूरमध्ये मुक्काम केला होता.
 
या मोहिमेत यश मिळाल्यानंतर त्यावेळी पेशव्यांनी दर्ग्याच्या घुमटाचं बांधकाम केलं. त्याचवेळी दर्ग्याच्या कमानीवर गणपतीची मूर्ती बसवण्यात आली असं म्हटलं जातं.
 
अशा प्रकारे गणपती विराजमान असलेला हा एकमेव दर्गा आहे. बाबूजमाल दर्गा हा हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे. सर्वधर्मीयांचं श्रद्धास्थान असलेला हा दर्गा असल्याचं, कोल्हापूरमधल्या मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर सांगतात.
 
हिंदू-मुस्लीमांचा अनोखा एकोपा
बाबूजमाल दर्ग्याची तालीम ही कोल्हापूरमधील सर्वांत जुनी तालीम आहे. साधारणपणे 1840 पूर्वी या तालमीची स्थापना झाली असावी.क्रांतिकारक चिमासाहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेनं ही तालीम उभी राहिली.
 
त्याकाळी इथं शिवाजी क्लब या क्रांतिकारक संघटनेच्या गुप्त बैठका घेतल्या जायच्या. 1913 साली शाहू महाराजांनी मोठी मदत करत या तालमीचं नूतनीकरण केलं होतं.
 
राजर्षी शाहू महाराज आणि ताराराणींचे सरदार जीवबा नाना जाधव यांच्या वाड्यावर त्याकाळी मोहरमच्या दिवसांत नाल्या हैदर पंजा बसवला जायचा.
 
हिंदू-मुस्लीम ऐक्य होण्याच्या दृष्टीनं शाहू महाराजांनी या पंजाची स्थापना बाबूजमाल दर्ग्यात करायला सांगितलं. त्यानुसार त्यांनी इथं पीर पंजा स्थान बांधून दिलं.
 
मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पंजाची पूजा कसबेकर-जाधव घराण्याकडून होते. तर सय्यद बंधू घराण्याकडे या पंजाची मुजावरकी आहे. त्याकाळी शाहू महाराजांनी पंजावर चढवण्यासाठी सोन्याचं जरीकाम केलेले दोन कोट ज्याला 'किनक्वाब' म्हटलं जातं आणि सोन्याची नाळ भेट म्हणून दिली होती.
 
या वस्तू इतक्या वर्षांनी आजदेखील वापरात आहेत.तसंच झुंबर, शोभेच्या हंड्या,आरसे या वस्तूही शाहू महाराजांनी भेट दिल्याची माहिती मुजावरकी घराण्याचे कार्यकर्ते जावेद सय्यद यांनी दिली.
 
मोहरम हा सण दहा दिवस साजरा केला जातो.यात सातव्या आणि आठव्या दिवशी स्वतः शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह या पंजाच्या दर्शनासाठी बाबूजमाल दर्ग्यावर यायचे अशी माहिती सय्यद यांनी दिली.
 
परंपरेनुसार आजही जाधव-कसबेकर कुटुंबीय या पंजाची देखभाल करतात तर सय्यद घराणे मुजावरकी करतात. जयवंत कसबेकर यांची चौथी पिढी ओंकार कसबेकर आणि जावेद सय्यद हे पंजाचं व्यवस्थपन पाहतात.
 
मोहरम आणि गणेशोत्सव होतो एकत्रित साजरा
1956 च्या आसपास कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवास सुरुवात झाली. त्याच वेळी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बाबूजमाल तालमीतही गणेशाची प्रतिष्ठापना केली जाऊ लागली. त्याकाळी 3 रुपये इतका सजावटीचा खर्च आला होता.
1952 आणि 1985 नंतर यंदा 32 वर्षांनंतर मोहरम आणि गणेशोत्सव हे सण एकत्र आलेत. बाबूजमाल दर्गा इथं नाल्या हैदर पंजा आणि गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्रित असे धार्मिक विधी केले जातात.सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते.
 
या काळात बाबूजमाल दर्ग्यावर अनेक भाविक मोठया संख्येनं पंजा आणि गणेशाच्या दर्शनासाठी येतात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक सार्वजनिक ठिकाणांसह घरातही पंजा आणि गणेश मूर्ती एकत्र बसवली जाते.त्यामुळं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणून या सोहळ्याकडे पाहिलं जातं.