शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (19:36 IST)

नाशिकमधील कोरोनाच्या निर्बंधाबाबत पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

chagan bhujbal
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून ज्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे अशा १४ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केल्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीत कोरोनाच्या निर्बंधाबाबत चर्चा करण्यात आली.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, आज घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नाशिक शहरातील कोरोना निर्बध सोमवारपासून हटविण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून ग्रामीण भागातील कोरोनाचे  निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच शहरातील रंगपंचमी व राहाडीला देखील परवानगी  देण्यात आली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाची बैठक आयोजित केली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीस नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरण देवराजन (Nashik Collector Gangatharan Deorajan) हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांनी घरात राहूनच रंगपंचमी (Rangpanchami) साजरी केली आहे. आता नाशिकमधील करोनाचे वातावरण निवळले आहे. नाशिकमध्ये ७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पाझिटीव्ह रेट हा ०.५ टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे आता करोना नाही तर इतर कारणांकडे लक्ष देऊ असे भुजबळ याप्रसंगी म्हणाले.
 
यापुढे बोलताना ते म्हणाले की, ५० हजार रुपयांच्या करोना मदत निधीसाठी १५ हजार २३३ प्रस्ताव आले होते. त्यातील ९ हजार ६६४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर ४हजार ४६८ प्रस्तावांची तपासणी सुरु आहे. तर १ हजार ८३ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.
 
दरम्यान दुसरीकडे नाशकात ८४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ६२ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. ४० हजार पेक्षा अधिक नागरिकांनी जिल्हाबाहेर जाऊन लसी टोचून घेतल्यामुळे ही आकडेवारी आणि टक्केवारी आणखी वाढणार आहे. त्यामुळे लवकरच नाशिक शहर निर्बंधमुक्त जाहीर होणार आहे.