रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:49 IST)

विदर्भात येत्या ४८ तासांमध्ये पुन्हा गारपीट होण्याची शक्यता

येत्या ४८ तासांमध्ये विदर्भामध्ये विशेषत: अमरावती आणि नागपूर विभागात ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता  हवामान खात्याकडून वर्तवलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्वत:सह गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. सोबतच मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ही माहिती सर्व संबंधित जिल्हाधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी तसेच सर्व संबंधित जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दूरध्वनी, व्हॉटसअप, एसएमएस व इमेलद्वारे तातडीने कळविण्यात आली आहे.