मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (14:20 IST)

स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी अंबड ग्रामस्थांचा नाशिक ते मुंबई अर्धनग्न पायी मोर्चा

ambad police station
नाशिक : अंबड औद्योगिक वासहतीत स्वतंत्र्य पोलीस स्टेशनच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहे. दत्त नगर, चुंचाळे शिवार आणि आदी परिसरातील नागरिकांनी आज नाशिक ते मुंबई असा अर्धनग्न पायी मोर्चा काढला आहे. आज सकाळी अंबडच्या एक्सलो पॉईंट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून नागरिकांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. केवळ नागरिकच नव्हे तर लोकप्रतिनिधी देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून दत्त नगर चुंचाळे भागात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. खून, दरोडे, धारदार शस्त्राने हल्ले, चोरी, चैन स्नॅचिंग अश्या घटना सर्रासपणे घडत आहे. जणू गुन्हेगारांना शहर पोलिसांचा धाकच उरला नाही तर उलट येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे. अंबड पोलीस ठाणेच क्षेत्र मोठं असून चुंचाळे, दत्त नगर भागातील नागरिकांना अंबड पोलीस ठाण्यात येण्यासाठी किंवा कुठली घटना घडल्यास पोलिसांना देखील चुंचाळे, दत्त नगर भागात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे या परिसरात स्वतंत्र्य पोलीस ठाणे व्हावे यासाठी येथील नागरिकांनी स्थानिक आमदार ,पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले. तसेच वेळोवेळी आंदोलन देखील केले. मात्र आपल्याकडे पर्याय उरला नसल्याचे सांगत हा प्रश्न मंत्रालय दरबारी असल्याने आपण नाशिक ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे मोर्चात सहभागी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी म्हंटले आहे.
 
अंबड, चुंचाळे या गावांसह औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून, संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येत नाही. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या या भागावर अपुर्‍या मनुष्यबळाअभावी ‘वॉच’ ठेवणे अंबड पोलिसांना शक्य होत नसल्याचेही आजवर दिसून आले आहे. त्यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, शेतकरी, कामगारांसह कारखानामालकांकडून जोर धरू लागली आहे. त्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन देऊन काही उपयोग झाला नाहीये. त्यामुळे आज नागरिकांनी नाशिक ते मुंबई असा अर्धनग्न पाई मोर्चा काढला आहे.
 
अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथील कर्डेल मळ्यात शुक्रवारी (दि.२५) एका वयोवृद्ध शेतकर्‍याची हत्या केली होती आणि कोठी चोरून नेली. या कोठीत काही कागदपत्रे, सोने व रोख रक्कम होती. कर्डेल यांच्या हत्येनंतर अंबड पोलिसांनी पाच ते सहा पथकांची नियुक्ती केली होती. अशा एक ना अनेक घटनांमुळे या परिसरात पोलिस ठाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
 
अंबड वासीयांच्या या नाशिक ते मुंबई पायी मोर्चाला झाली. मात्र त्यानंतर मात्र आमदार सिमा हिरे यांनी मध्यस्ती केली. त्यामुळे आता पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करायला आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. अशात पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor