अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयची मदत घेणार
महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री यांच्या शोधात वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. अखेर या प्रकरणात तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचलनालयाने अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयची मदत घ्यायचे ठरवले आहे. याआधीच ईडीने अनिल देशमुख यांच्या वारंवार गैरहजेरीमुळे लूक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. अनिल देशमुख यांच्यासोबतच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या शोधात ईडीकडून सर्च मोहीम सुरू आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा ईडीकडून या दोघांनाही समन्स बजावण्यात आले आहेत.
आतापर्यंत ईडीकडून अनिल देशमुख यांना पाचवेळा तसेच त्यांचा मुलगा ऋषीकेश देशमुखला दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी ईडीकडे याआधीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जबाब नोंदविण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात त्यांची याचिका न्यायप्रविष्ट असल्यानेच वारंवार ईडीने समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत. आतापर्यंत अनेकदा वकिलांकडून ईडीला पत्र पाठवून हजर राहण्याची परवानगी अनिल देशमुख यांनी मागितली होती. पण प्रत्यक्षात मात्र ते हजर राहिलेच नाहीत. आतापर्यंत या संपुर्ण प्रकरणात अनिल देशमुख यांची विविध ठिकाणची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली आहे.