मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (11:17 IST)

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा दावा, काय आहे प्रकरण?

आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. रविवारी (31 ऑक्टोबर) पार पडलेल्या गट 'ड' च्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच लीक झाल्याचा दावा काही उमेदवारांकडून करण्यात आला आहे. 
 
यापूर्वी 24 ऑक्टोबरला झालेल्या आरोग्य विभागाच्या गट क ची प्रश्नपत्रिका सुद्धा परीक्षेआधीच व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली होती. 
 
सलग तिसऱ्यांदा परीक्षेत हा गोंधळ उडाल्याने आरोग्य विभागाने परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला परीक्षा सुरळीत पडली असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. 
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण 3462 पदं भरण्यासाठीची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबरला पार पडली. 
 
राज्यातील 1364 केंद्रांवर  परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी 4 लाख 61 हजार 497 उमेदवारांनी अर्ज केले होते तर 4 लाख 12 हजार 200 उमेदवारांनी प्रवेशपत्र घेतले होते. 
 
आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये पुन्हा गोंधळ?
एमपीएससी महाराष्ट्र समन्वय समिती या विद्यार्थी संघटनेने औरंगाबाद येथून प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा दावा केला आहे.  
 
या संघटनेचे सदस्य महेश घोरबुडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "रविवारी (31 ऑक्टोबर) झालेल्या गट ड या परीक्षेचा पेपर शनिवारी रात्रीच लीक झाला. शनिवारी (30 ऑक्टोबर) रात्रीपासून टेलिग्राम आणि व्हॉट्स अॅपवर या प्रश्नपत्रिकांमधील सर्व उत्तरं व्हायरल झाली."
या संघटनेने याबाबत ट्वीटही केलं आहे. ते म्हणतात, "आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला पेपर औरंगाबाद येथून लीक झाला.आम्ही औरंगाबाद शहर पोलिसांना ईमेल मार्फत तक्रार केली आहे. पेपर 100 टक्के फुटल्याचा पुरावा आमच्याकडे आहे."
एमपीएससी समन्वय समितीने यासंदर्भात शिवाजी नगर पोलीस स्थानआणि पुणे सायबर सेल यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. तसंच येत्या आठ दिवसांत सर्व परीक्षा रद्द न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
 
यासाठी उमेदवारांनी पुन्हा एकदा खासगी कंपनीवर टीका केलीय. तसंच परीक्षांमध्ये सातत्याने घोळ होत असताना आरोग्य विभाग एकाच कंपनीकडून या परीक्षा का घेत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  
 
24 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्येही गोंधळ उडाल्याचं चित्र होतं. पुणे, मुंबई, नाशिक आणि इतर काही परीक्षा केंद्रांवरुन परीक्षार्थींच्या तक्रारी समोर आल्या. 
 
काही ठिकाणी प्रश्नपत्रिका पोहचण्यास विलंब झाला तर काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका अपुऱ्या पडल्या. काही जणांनी पर्यवेक्षक वेळेत आले नाहीत असाही दावा केला. तसंच अनेक उमेदवारांना प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअॅपवर मिळाली अशीही तक्रार करण्यात आली आहे. 
 
याबाबत काही उमेदवारांनी पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. 
 
आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण
आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. 
 
त्या म्हणाल्या, "चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्हयांमध्ये उमेदवारांनी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परीक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आली होते.  त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही."
या परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना परिस्थिती समजवून सांगितल्यानंतर भंडारा वगळता इतर उमेदवारांनी परीक्षा दिल्याचंही त्या म्हणाल्या. 
बीड येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाव्दारे परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलीसांनी वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
आतापर्यंत काय घडलं?
आरोग्य विभागाची प्रलंबित भरती परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली. ग्रुप 'क' आणि 'ड'साठी ही परीक्षा होणार होती. परंतु परीक्षेच्या काही तास आधी आरोग्य विभागाने ही परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं.
 
राज्यभरातील उमेदवार यामुळे निराश झाले. सरकारी भरती प्रक्रियेला आगोदरच विलंब होत असताना ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने गोंधळ उडाला.
 
मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेले होते. त्यामुळे आरोग्य विभागावर टीका झाली.
 
ही परीक्षा पुढे ढकलून 24 ऑक्टोबरला घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. 24 ऑक्टोबरलाही विविध परीक्षा केंद्रांमधून उमेदवारांच्या तक्रारी समोर आल्या.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील निशिगंधा यांनी नागपूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या क्लार्क या पदासाठी अर्ज भरला होता. 24 तारखेला पूर्ण तयारीनिशी त्या परीक्षा केंद्रावर पोहचल्या.
 
"मला प्रश्नपत्रिका मिळाली आणि मला कळलंच नाही नेमकं काय झालं आहे. कारण 100 पैकी 60 गुणांचे प्रश्न नर्सिंगचे होते. मी क्लार्क या पदासाठी अर्ज भरला होता. त्यामुळे नर्सिंगचे प्रश्न कसे आले हे मला कळत नव्हतं. तसंच माझ्या प्रवेशपत्रावर असलेला कोड नंबर आणि प्रश्नपत्रिकेवर असलेला कोड नंबर हा वेगळा होता. मी तिथे पर्यवेक्षकांनाही कळवलं पण काही फायदा झाला नाही," बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं.
 
मुंबईतील साकीनाका या परीक्षा केंद्रावर तर प्रश्नपत्रिका एक तास आधीच फुटल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
 
या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी गेलेले अविनाश बोरांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला तिथे पोहचल्यावर कळलं की अनेक उमेदवारांच्या व्हॉट्स अपवर प्रश्नपत्रिका आली आहे. यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. इतर सर्व उमेदवार संतापले आणि आंदोलन सुरू झालं. प्रश्नपत्रिका फुटल्याने त्याचा विरोध म्हणून आम्ही परीक्षा दिलीच नाही. आता विभागाने आम्हाला गैरहजर राहिल्याचा शेरा दिला आहे."
 
आरोग्य विभागाच्या या भरतीसाठी परीक्षा घेण्याचं कंत्राट खासगी कंपनीकडे आहे. या गोंधळानंतर आरोग्य विभागाने आता या कंपनीला नोटीस बजावल्याची माहिती आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
पण सप्टेंबर महिन्यात ऐनवेळी परीक्षा रद्द केल्यानंतर आणि त्यावेळी परीक्षा सुरळीत घेता आली नसल्याने पुन्हा याच खासगी कंपनीला कंत्राट का दिलं? असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
 
महेश घरबुडे म्हणाले, "खासगी कंपनीची अकार्यक्षमता वारंवार दिसली तरीही आरोग्य विभागाने या कंपनीला परीक्षेचं कंत्राट का दिलं? राज्यातील शेकडो तरुण मुलांचे भवितव्य या परीक्षांवर अवलंबून असतं. तेव्हा सरकार या परीक्षा जबाबदारीने घेईल असं अपेक्षित आहे. पण अशा त्रुटींमुळे उमेदरावांची संधी वाया जाते. हा मुलांसोबत अन्याय आहे."
 
'या कंपनीशी सरकारचे काय लागेबांधे आहेत, चूक होऊनही परीक्षा घेण्याचे कंत्राट या कंपनीला दिले जाते?' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.