शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (20:52 IST)

‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांची मुनगंटीवारांना कोपरखळी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये  विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. यामध्ये “सुधीर मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, असं म्हणत त्यांनी मुनगंटीवारांना देखील कोपरखळी मारली.
 
 सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाच्या स्टाईलवरून यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोमणा मारला. “मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. कामकाज ऐकताना अचानक मला भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी अथेल्लो, मी हॅम्लेट…आणि शेवट असा केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का किंमत! सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश.. देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की आमचं कसं होणार? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
यावेळी, “माझं जसं झालंय, तसंच तुमचंही झालंय. कलागुणांना वाव नाही हो या क्षेत्रात. मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली. आता बंद आहे. पण कलाकार कुठे थांबून नाही राहात. जिथे संधी मिळेल, तिथे कला उचंबळून येते. पण सुधीरभाऊ, ती मारू नका”, असंही उद्धव ठाकरे सुधीर मुनगंटीवारांना म्हणाले.