देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ३ ठाण्यांचा समावेश, जयंत पाटलांकडून माहिती
देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा या तीन पोलीस स्टेशनचा या यादीत समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत. पहिलाय आणि दुसऱ्या रांगेतील नेत्यांनी कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता हे काम पाहण्यासाठी जावं, असाही सल्ला त्यांनी दिला. सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील हे बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा येथील पोलीस ठाण्यांचा समावेश आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये झालाय. दीक्षित गेडाम यांनी सर्व पोलीस स्टेशन आयएसओ प्रमाणित करण्याची मोठी मोहीम हाती घेतली. राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत. माझी पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसलेल्या नेत्यांना विनंती आहे कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता फक्त चहा घ्यायला जाऊन या.”
“पोलिसांनी ही व्यवस्था दुरुस्त केलीय हे पाहण्याचं आपल्याला भानच नसतं. सरकारी अधिकाऱ्याला देखील मन असतं, ह्रदय असतं. आपण त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं पाहिजे. आपण केस असेल तरच फोन करतो. पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे. हे करा, ते करा, बघतोच तुम्हाला, इकडं घालवतो, तिकडे घालवतो असं बोललं जातं. त्यांना नोकरीच करायची असते, पण ही लोकं काम करत असतात,” असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. “मागेच पोलिसांनी चोरांचा पाठलाग करून सोनं, दागिणे हस्तगत केलेले नागरिकांना माझ्याच हस्ते परत दिलेत. ही खरी सेवा असते. ज्याचं सोनं चोरी जातं त्याचं सर्वस्व जातं, त्यामुळे हे सोनं परत मिळाल्यावर हे नागरिक पोलिसांना खूप आशीर्वाद देत असतील, याची मला खात्री आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.