बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (08:18 IST)

विक्री करण्यासाठी नाशकातील चिमुरड्याचे अपहरण; असे झाले उघड

गोदाघाटावरून अवघ्या १० महिन्याच्या चिमुरडीचे विक्री करण्यासाठी अपहरण करणा-याला तरुणाला नाशिक शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेने सातपूरमधून अटक केली आहे. या तरुणाने अपहरण केलेल्या मुलीची सुटका अवघ्या २४ तासात पोलिसांनी केली आहे.
 
८ ऑगस्ट रोजी सोमवारी दहीपुलाजवळ असलेल्या म्हसोबा पटांगणावर ही लहान मुलगी खेळत असतांना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञात संशयिताने तिचे अपहरण केले. त्यानंतर या घटनेची तक्रार सोनी युवराज पवार (रा. गौरी पटांगण) यांनी पंचवटी पोलिस ठाणे येथे केली. अवघ्या १० महिन्यांची असलेल्या या लहान मुलीचे नाव गायत्री आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखांना गायत्रीच्या अपहरणाची माहिती देण्यात आली. मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने गायत्रीची माहिती घेत शहरभरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठा, गर्दीची-वर्दळीची ठिकाणी शोध घेतला. दरम्यान, उपनगरीय परिसरातही पोलिसांनी शोध सुरू केला असता, खबऱ्याकडून पथकाला महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार, मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सातपूर कॉलनी परिसरातून संशयित मकरंद भास्कर पाटील (रा. आनंद छाया अपार्टमेंट, सातपूर कॉलनी, सातपूर) याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून अपहृत गायत्रीही पोलिसांना मिळून आली. संशयित पाटील याने गायत्रीची विक्री करण्यासाठी अपहरण केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय बारकुंड, मध्यवर्ती गुन्हेशाखेचे डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील माळी, हवालदार श्रीराम सपकाळ, संजय गामणे, संदीप पवार, आनंदा काळे यांच्या पथकाने बजावली.