गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:52 IST)

कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका साकारली : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या नथुराम भूमिकेच्या वादावर प्रतिक्रीया देत अमोल कोल्हेंची पाठराखण केली. कलावंत म्हणून मी सर्वांचा सन्मान करतो. अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका साकारली, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
 
डॉ.अमोल कोल्हे यांनी सिनेमात नथुरामांची भूमिका साकारली याचा अर्थ ते त्या विचारांचा आणि प्रवृत्तीचे समर्थन करतात असा होत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून ही भूमिका साकारली आणि त्याकडे तशाच पद्धतीने बघितले जावे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
 
महात्मा गांधींवर सिनेमा आला. गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला. गांधीचे विचार संपूर्ण जगाला समजले. त्या सिनेमातही कोणतीही नथुरामाची भूमिका केली. भूमिका करणारा कलाकार होता नथुराम नव्हता. शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात संघर्ष झाला. त्यात जर कोणी औरंगजेबाची भूमिका साकारतो तेव्हा तो लगेचच मोघली साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका साकारतो. किंवा राम आणि रावणाचा संघर्ष असेल आणि एखादी व्यक्ती रावणाची भूमिका साकारत असेल तर ती लगेच रावण होत नाही. तो एक कलाकार म्हणून तिथे असतो. सीतेचे अपहरण केलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केले असे होत नाही, त्यामुळे अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका साकारली त्याकडे त्याच नजरेने पहावे, असे शरद पवार यांनी म्हटले.