रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:35 IST)

अन्यथा औषध विक्रेत्यांना कोरोनाशी संबंधित औषधे दुकानात ठेवताना विचार करावा लागेल

कोरोनाचे होम टेस्टिंग किटच्या ऑनलाइन विक्रीवर शासनाचा कोणताही अंकुश नाही. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांवर विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन लादू नये. अन्यथा औषध विक्रेत्यांना कोरोनाशी संबंधित औषधे दुकानात ठेवताना विचार करावा लागेल आणि आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेने दिला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
 
अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना होम टेस्टिंग किटचे रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाबाबत अनेक औषध विक्रेत्यांनी महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेकडे नाराजी व्यक्त केली आहे. औषध विक्रेत्यांपेक्षा होम टेस्टिंग किटची मोठ्या प्रमाणात ऑनलाइन विक्री केली जात आहे आणि त्यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही. औषध विक्रेत्याने ग्राहकास आधार नंबर किंवा मोबाइल नंबर मागितल्यास ग्राहकाकडून त्यास विरोध केला जात आहे अथवा वाद-विवादाची परिस्थिती निर्माण होत आहे, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.
 
रुग्णाने सेल्फ टेस्टिंग किटचा वापर करून पॉझिटिव्ह आल्यानंतरही निगेटिव्ह असल्याचे सांगितल्यास त्यावर प्रशासनाचा कसा अंकुश राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये किटचा वापर रोखण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शासन अथवा प्रशासन जोपर्यंत ऑनलाइन विक्री थांबवणार नाही, तोपर्यंत औषध विक्रेत्यांवरही तपशील ठेवण्याचे बंधन घालू नये, असे नमूद केले आहे.