कोयना धरण कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे
मागील तीन दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर नवजा आणि कोयना येथे मुसळधार विक्रमी पाऊस सुरू आहे.पावसाचा जोर कायम असून गुरुवार सायंकाळपासून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात दहा टीएमसी पाण्याची भर पडली आहे.त्यामुळेच धरणाचे वक्री दरवाजे प्रथमच दोन फूट उघडण्यात आले. दरवाजातून प्रतिसेकंद 9567 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वीजगृहातून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणाच्या वक्री दरवाजातून सकाळी दहा वाजता प्रतिसेकंद 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे.पाणी सोडल्याने कोयना नदीसह कृष्णा तसेच अन्य नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणात 72.88 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.सायंकाळनंतरही पावसाचा जोर कायम असल्याने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास धरणातील पाणीसाठा 78 टीएमसीहून अधिक झाला होता.
शुक्रवारी सकाळी हाच पाणीसाठा 82.98 टीएमसीवर पोहचला. मागील सहा तासांचा विचार करता कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी 74 हजार 531 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.मागील चोवीस तासातील धरणात येणाऱ्या पाण्याची सरासरी प्रतिसेकंद आवक ही 2 लाख 67 हजार 529 क्युसेक इतकी झाली आहे.यावरून गुरुवारी दिवसभरात महाबळेश्वर नवजासह कोयना आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाची कल्पना येते.कोयनानगर येथे तब्बल 610 मिलिमीटर पाऊस झाला असून नवजा येथे 746 मीटर पावसाची नोंद झाली आहे.महाबळेश्वर येथे 556 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.