शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (21:39 IST)

मित्रांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने देशाची संपत्तीच विकायला काढली : नाना पटोले

इंधन दरवाढीच्या मु्द्दयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ काही उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने देशाची संपत्तीच विकायला काढली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्ही मोदी चले जावचा नारा दिल्यानंतरही भाजपने त्याला विरोध केला नाही, त्यामुळे भाजपलाही मोदी नको आहेत, असाच त्याचा अर्थ निघतो, असा दावाही पटोले यांनी केला. नाना पटोले यांनी टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. 
 
यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे राहिले नसून सरकार फक्त काही निवडक उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी काम करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर आले आहेत पण देशात मात्र दर उच्चांकी पातळीवर गेले आहेत. अनेक भागात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. सद्याच्या काळात डिझेल २५ रुपये लिटर आणि पेट्रोल ३५ रुपये लिटर विकायला हवे पण सरकार महाग इंधन विकून नफेखोरी करत आहे. इंधन आणि गॅसचे दर वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असून उद्योगपती मित्रांचा फायदा करत आहे. केंद्रातील भाजप सरकार याच पद्धतीने काम करत राहिले तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल असे पटोले म्हणाले.