आईकडून पोटच्या मुलांची हत्या
रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने आवळून आईनेच खून केला असल्याची घटना मुळशी तालुक्यातल्या शिरवली येथे घडली आहे. पोटच्या मुलांचा निर्दयीपणे खून करून जन्मदाती आई निघून गेली. सदर प्रकाराबाबत तिच्या नवर्याोने पौड पोलिसांमध्ये तक्रार दिली. हा प्रकार समजताच पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही तासात खुनी आईला पोलिसांनी लोणावळा येथून ताब्यात घेतले. आरोपीचा पती संजय जगन्नाथ सोलंकी याने फिर्याद दिली आहे. पौड पोलीसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार 5 जानेवारीला दुपारी आरोपी पूना संजय सोलंकी हिने रागाच्या भरात मोठी मुलगी चंदा संजय सोलंकी व मुलगा आनंद संजय सोलंकी यांचा रस्सीने गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडप्यात टाकून निघून गेली. या प्रकाराबाबत पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पूना हिला लोणावळा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय ढोले यांनी भेट दिली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहेत.