बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (13:46 IST)

इंजिनियर मुलाने आजारी आईचा निर्घृण खून करून आत्महत्या केली

असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगातला आईविना भिकारी, पण आजच्या कलीयुगात ही म्हण खोटी ठरली आहे. आई मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्याच्या धनकवडी येथे घडली आहे. इथे एका सुशिक्षित इंजिनियर मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचे आयुष्य संपवून तिला ठार मारल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या धनकवडी येथे गणेश मनोहर फरताडे या तरुणाने आपल्या 76 वर्षाच्या आईला आधी औषधांचा ओव्हर डोस दिला नंतर तिच्या तोंडाला प्लास्टिकची पिशवी गुंडाळून दोरीने गळा आवळून निर्घृण खून केला. निर्मला मनोहर फरताडे असे या मयत महिलेचे नाव आहे. 
माहितीनुसार, आरोपी मुलाने आईचा खून करून स्वतः आत्महत्या केली आहे. 
मयत गणेश यांच्या वडिलांचे 5 वर्षांपूर्वीच आजाराने निधन झाले होते आणि त्याच्या आईला अनेक व्याधी होत्या. आईच्या आजारपणात खूप खर्च होत होता. तसेच कोरोना काळात त्याची नौकरी सुटली आणि त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. कर्जाचे पैसे कुठून फेडायचे सतत ही चिंता त्याला सतावत होती. बऱ्याच वेळा त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला पण मी गेल्यावर आईचे सांभाळ कोण करणार ? असा प्रश्न त्याला पडला होता. 
गणेश ने मध्य रात्री आधी आईला औषधाचे ओव्हर डोस देऊन तोंडाला प्लास्टिकची पिशवी घालून दोरीने गळा आवळून खून केला. नंतर 'मी आईला मारले आहे आणि बेरोजगारी आणि कर्जबाजारी झाल्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे 'असा मेसेज रात्री दोनच्या सुमारास त्याने आपल्या मावस बहिणीला आणि इतर नातेवाईकांना केला. नंतर त्याने छतावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत गणेशच्या मावस बहिणीच्या फिर्यादी वरून सहकार पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.