शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (08:21 IST)

मुश्रीफ हसत म्हणाले, मी काहीही चुकीचं केलं नाही, त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली

गेल्या आठवड्यात ईडीने हसन मुश्रीफ यांना नोटीस बजावली होती. सोमवारी चौकशीसाठी हजर राहा, अशी नोटीस ईडीने पाठवली होती. परंतु हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर मुश्रीफ ईडी कार्यालयात पोहोचले. आज (बुधवार) दुपारी साडेबारा वाजता ते ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीने त्यांची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली.
 
ईडीच्या चौकशीनंतर हसन मुश्रीफ यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुश्रीफ म्हणाले, “उच्च न्यायालयाने काल दिलासा दिल्यानंतर, आम्ही कालही चौकशीसाठी आलो होतो. ईडीने मला काल समन्स दिला होता. आज दुपारी साडेबारा वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार मी दुपारी साडेबारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ईडीने जे-जे प्रश्न विचारले त्याची अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली. त्यांना सहकार्य केलं. ईडीने पुन्हा सोमवारी साडेबारा वाजता चौकशीसाठी बोलावलं आहे.”
 
आठ तासाच्या चौकशीनंतरही तुमच्या चेहऱ्यावर थकवा का नाही? तुम्ही आनंदी दिसत आहात, असं विचारलं असता मुश्रीफ हसत म्हणाले, ” मी काहीही चुकीचं केलं नाही, त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांना सहकार्य केलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर चौकशी झाली. अनेक प्रश्न होते, त्यावर आता मी बोलणं योग्य नाही. आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा सोमवारी पुन्हा चौकशासाठी बोलावलं आहे, आम्ही पुन्हा समाधनकारक उत्तरं देऊ…”