सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (10:14 IST)

Nashik Bus Accident: नाशिकमध्ये शिर्डीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 10 प्रवाशांचा मृत्यू... 40 जण जखमी

accident
नाशिक : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. नाशिक-सिन्नर रस्त्यावर एका खासगी लक्झरी बसची ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार तर 40 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व प्रवासी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. मृतांमध्ये 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. जखमींना सिन्नर ग्रामीण रुग्णालय आणि यशवंत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील प्रवासी हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील रहिवासी असून ते शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईपासून सुमारे 180 किमी अंतरावर नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पठारे शिवारात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही, तपास सुरू आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited by : Smita Joshi