शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (21:21 IST)

नाशिक : हर हर महादेव’ चित्रपट दाखवणार नाही, थिएटर चालकांचा निर्णय

‘हर हर महादेव’चित्रपटाच्या मुद्द्यावरून मनसे-राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे चित्र आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधील थिएटर चालकांनी ‘हर हर महादेव’ चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
नाशिक शहरातील एकाही थिएटरमध्ये  ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो उपलब्ध नाहीये. राज्यात चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादामुळे थिएटर मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने सर्व थिएटर चालकांनी जोपर्यंत वाद मिटत नाही तोपर्यंत हर हर महादेवचा शो न लावण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या शो दरम्यान कुठले आंदोलन झाले, त्यातून कुठल्या प्रेक्षकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला, कुठल्या प्रकारच्या वादावादीचा प्रसंग निर्माण झाला, थिएटरचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न थिएटर चालकांकडून निर्माण केला जात आहे. त्यामुळे जोपर्यंत वाद शमणार नाही तोवर आम्ही हर हर महादेवचा शो लावणार नाही अशी माहिती थिएटर चालकांनी दिली.
 
दरम्यान, शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतरही काही संघटनांनी शहरातील थिएटर चालकांची भेट घेत हर हर महादेवचा तसेच भविष्यात येऊ घातलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचे शो दाखवू नये, अन्यथा शो बंद पाडण्यात येतोल असा इशारा दिला. तर दुसरीकडे मनसेच्या पदाधिकार्‍यांनी पीव्हीआर थिएटर येथे भेट देत तात्काळ चित्रपटाचा शो सुरू करावा अन्यथा मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Edited by-Ratnadeep Ranshoor