1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (21:53 IST)

पोलीस महिला अंमलदार यांना ८ तासांची ड्युटी, पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा आदेश

राज्यातील पोलीस महिला अंमलदार यांना ८ तासांची ड्युटी देण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. कामाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षक यांना आपल्या अधिपत्याखालील महिला अंमलदार यांना ८ तासांची ड्युटी द्यावी असे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जारी केले आहेत. त्यामध्ये पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस शिपाई तसेच पदसिद्ध कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राज्यात एकुण १ लाख ९२ हजार पोलीस कर्मचारी आहेत. त्यापैकी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ३० हजारांच्या घरात आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महासंचालक पदाची सूत्रे घेतल्यानंतरचा हा सर्वात धाडसी निर्णय मानला जात आहे. पोलीस महासंचालक पदावर रूजू झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत धाडसी असे ९ निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक पोलीस महिला कर्मचाऱ्यांना ८ तास ड्युटी देण्याचा निर्णय आहे.
 
याआधीच राज्यातील महिला पोलीस अंमलदार यांची दिवसाची ड्युटी ८ तास करण्याचा विचार झाला होता. सध्या राज्यातील पोलीस अंमलदार यांची दिवसाची ड्युटी ८ तास केल्यास त्यांच्या रजा मागण्याचे प्रमाण, रूग्णनिवेदन करण्याचे प्रमाण तसेच गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच कुटुंबाला जास्त वेळ दिल्याने ताण तणावही कमी होईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. राज्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पोलीस ठाणे आणि शाखा याठिकाणी महिला अंमलदार यांना दिवसभरात ८ तासांची ड्युटी दिली जाईल याची खात्री करावी असेही आदेशात म्हटले आहे.