शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बीड , बुधवार, 10 मार्च 2021 (16:15 IST)

गेल्या १८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ‘वैद्यनाथ’च्या कर्मचाऱ्यांकडून कारखाना बंद, संकटात पंकजा मुंडे

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याची बाब समोर आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या या कारखान्याने पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी कारखाना बंद केला आहे. पगार नाही तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनूसार, परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालकांना निवेदन दिले होते. वैद्यनाथच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या १८ महिन्यांपासून पगार थकीत आहे. पगार १० दिवसांत आमच्या खात्यात वर्ग करा अन्यथा आम्ही कारखाना बंद करू असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. दहा दिवस होऊनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळ पासूनच कारखाना बंद केला. या संपात वजन काटा, सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी सहभागी झालेत.
 
दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत मेहनतीने उभा केला. या कारखान्याने उत्पादनाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामुळे कारखान्याचे नाव आशिया खंडात झाले होते. दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर कारखान्यासमोर गेल्या काही वर्षापासून अनेक अडचणी निर्माण झाल्यात.