मराठवाडा आणि विदर्भचा काही भाग आणि घाटमाथ्यावर पाऊसाची शक्यता
राज्यात कडाक्याची थंडी असताना मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह गेल्या ६ महिन्यांपासून बदलणाऱ्या हवामानामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे वातावरण तयार झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम हवामानावर होत असल्याने राज्यात थंडी आणि पाऊस असं वातावरण सध्या दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांवरही या अवकाळी पावसाचं सावट असणार आहे.
याबाबत अ हवामान खात्याने दिलेली माहिती देत असे सांगितले की, गेल्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यताही गुरूवारी भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यासह अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण पोषक आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. यामुळे आंबा, इतर भाजीपाल्यासह पिकांवर भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.