प्रताप सरनाईकांची 11.35 कोटी रूपयांची संपत्ती ईडीकडून जप्त
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सातत्याने होत आहे. आधी अनिल देशमुख मग नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्यांच्याशी संबंधित ईडीने 2 फ्लॅट आणि एक जमीन जप्त केली आहे. या जप्त केलेल्या प्रॅापर्टीची किंमत 11.35 कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत 3254 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलंय.
NSCL प्रकरणातील आस्था ग्रुपने 21.74 कोटी रूपये विहंग आस्था हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर केले होते. यातील 11.35 कोटी रूपये विंहग एंटरप्रायझेस आणि विहंग इम्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं आहे. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात आहेत.
काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी ते उद्धव ठाकरेंकडे सातत्याने करत होते. अशा स्थितीत आगामी काळात महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्याआधीच शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.