यापुढे पानटपरी विक्रेत्यांना दुकानात यापुढे चॉकलेट, वेफर्स, बिस्किटं यासारखे खाद्यपदार्थ विकण्यास राज्यभरात बंदी असेल. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये चॉकलेट, बिस्किट, चिप्स यासारखे खाद्यपदार्थ आढळले, तर दुकानांवर कारवाई करण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलं.
पानाच्या टपऱ्यांवर सर्रासपणे गोळ्या, चॉकलेट, बिस्किटं, शीतपेयं, चहा, कॉफी, वेफर्स, चिप्स यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे हे पदार्थ घेण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि तरुणवर्ग दुकानात येतो. त्याचवेळी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाकडे आकर्षित होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन जडण्याची शक्यता वर्तवत सरकारने हा निर्णय घेतला आहे.