शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (21:54 IST)

रझा अकादमीच्या कार्यालयांवर छापे, दंगल पू्र्वनियोजित असल्याचा आमदार मुफ्तींचा दावा

मालेगाव शहरातील इस्लामपुरा भागातील रझा ॲकॅडमीच्या मुख्य कार्यालयावर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री छापा टाकून कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज व कागदपत्र जप्त केले आहे. मालेगावात झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता. असे वृत्त समोर आल्यानंतर पोलीसांनी छापेमारी केली आहे.
 
नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप व्हायरल करण्यात आली होती. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे. दंगलीच्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
 
रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे:
त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यालयावर अखेर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. मालेगावमध्ये रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाने बंद पुकारतस रॅली काढली होती. त्यानंतर हिंसाचार उसळला होता.
 
त्यात अनेक दुकानांची राखरांगोळी करण्यात आली. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी आयोजकांवर फक्त गुन्हा दाखल झाला होता. पुढची कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नव्हती. पोलिसांच्या या भूमिकेवर स्वतः आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे उशिरा का होईना रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे टाकून कारवाई करण्यात आली.
 
आमदार मुफ्तींचे गंभीर आरोप:
मालेगावमध्ये दंगलीप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. मालेगावमध्ये दंगल घडवून आणण्याचा काही समाजकंटकांचा कट होता. मात्र, मालेगावच्या नागरिकांनी तो उधळून लावला.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याप्रकरणी भाजपवर आरोप केले आहेत. त्यालाही आमदार मौलाना मुफ्ती यांनी दुजोरा दिला. शिवाय आठ दिवसांपूर्वी नगरसेवक आयाज हलचलने त्रिपुरा घटनेबाबत बैठक घेतली. भडकावू भाषण केले. मात्र, याची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.