शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:11 IST)

रायसोनी महाविद्यालयाने पैसे न भरल्याने नापास केले ,विद्यार्थी, पालकांचा आरोप

जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेन्टमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्याअंकेश गुप्ता या विद्यार्थ्याने शैक्षणिक फी पूर्ण न भरल्याने त्याला ऐनवेळी एक्स्टर्नल परीक्षेची लिंक देत त्यात नापास करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी केला आहे.दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे.
 
अंकेशचे पालक जगदीश गुप्ता यांनी दिलेल्या पत्रकानुसार,अंकेश हा जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेन्टमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. दि.७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी त्याला एक्स्टर्नल परीक्षेचा फोन आला आणि त्याच वेळी परीक्षा देण्यास सांगण्यात आले. त्यावेळेस अंकेश वडिलांच्या पाणीपुरीच्या दुकानावर व्यवसाय करीत होता. काही मिनिटात आरएसी, फायनाईट एलिमेंट आणि मेजर प्रोजेक्ट हा तीन विषयांची परीक्षा घेण्यात आली.काही दिवसांपूर्वी निकाल लागला असता मेजर प्रोजेक्ट या विषयात कमी मार्क असल्याने तो नापास झाला.
 
मुलाच्या नापास झाल्याने जगदीश गुप्ता हे अंकेशसह दि.२३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात गेले. विविध प्राध्यापक, प्रोजेक्ट गाईड यांची त्यांनी भेट घेतली असता यावर मार्ग काढू असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.पालीवाल यांची शालेय फी संदर्भात भेट घेतली असता त्यांनी पूर्ण फी भरल्याशिवाय परीक्षा होणार नाही असे सांगितले होते. शैक्षणिक कर्ज काढून १५ हजार जमा केल्यानंतर देखील पूर्ण फी भरण्याचे त्यांनी सांगितले होते. शैक्षणिक फी पूर्ण न भरल्याने आणि एक्स्टर्नल परीक्षा घाईघाईत घेतल्याने अंकेश नापास झाला असल्याचा आरोप त्याचे पालक जगदीश गुप्ता यांनी केला आहे.या संदर्भांत ते जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंना देखील निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.