रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (08:01 IST)

एमपीएसीच्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी

येत्या  ४ सप्टेंबरला  एमपीएसीची परीक्षा घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जाईल अशी भूमिका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.कोरोना काळात केवळ अत्यवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तसेच दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट घेऊन लोकल प्रवासाची परीक्षेसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती.

 केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आशिष शेलार यांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकिट पाहून रेल्वेचे तिकिट दिले जाईल अशी भूमिका घेतली आहे.यामुळे केंद्राच्या निर्णयावर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आशिष शेलार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
 
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या परवानगी नंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन राज्य सरकारने केंद्राशी चर्चा करण्याचे आवाहन केलं आहे.“४ सप्टेंबर,शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केली. हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे,असेही सांगितले. म्हणून तातडीने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली.त्यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली.आता राज्य शासनाने याबाबत तातडीने रेल्वेशी संपर्क केल्यास शनिवारी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल” असे आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.