शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (16:01 IST)

कुठल्याही परिस्थितीत विद्यापीठातील मुलींना खुरपायला जावू देणार नाही

- आ.सतीश चव्हाण यांचा विद्यापीठ प्रशासनाला इशारा
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कमवा व शिका योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थीनींना विद्यापीठ प्रशासन खुरपण्याची कामे देतात. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थीनी या ग्रामीण भागातील आहेत. आजपर्यंत या विद्यार्थीनी गावी हेच काम करीत होत्या आणि आता विद्यापीठात देखील त्यांना हेच काम करावे लागते त्यामुळे अशा विद्यार्थीनींना यापुढे कौशल्यावर आधारित काम द्यावे, कुठल्याही परिस्थितीत विद्यापीठातील मुलींना खुरपायला जावू देणार नाही, असा इशारा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विद्यापीठ प्रशासनला दिला आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आ. सतीश चव्हाण यांनी भेट देवून तेथील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते आज विद्यापीठात उपलब्ध नव्हते. त्यामुळे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ.अशोक तेजणकर यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी त्यांच्या निर्दशनास आणून देत विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरीत मार्गी लावावेत अशी आग्रही मागणी केली. त्यात प्रामुख्याने कमवा व शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थीनींना विद्यापीठात खुरपणी करण्याचे काम दिले जाते. कमवा व शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थींनींना परीक्षेच्या काळात सुध्दा सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत काम करून १० वाजता परीक्षेला जावे लागते. त्यामुळे अशा विद्यार्थीनींना परीक्षेच्या दिवशी सुट्टी देऊन त्या दिवसाचे त्यांना मानधन द्यावे. विद्यापीठातील वस्तीगृहात मेस सुरू करावी. सर्वच वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने त्यासाठी कायमस्वरूपी योग्य ती उपाययोजना करावी. विद्यापीठातील आरोग्य केंद्रास महिला आरोग्य अधिकारी नेमून त्याठिकाणी विविध सोई-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रमुख मागण्या प्रकुलगुरूकंडे केल्या.
 
यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, किशोर शितोळे, सिनेट सदस्य डॉ.राम चव्हाण, डॉ.स्मिता अवचार, डॉ.विलास खंदारे, प्रा.सुनील मगरे, डॉ.भारत खैरनार, शेख जहूर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे, अमोल दांडगे, अक्षय पाटील, दीपक बहीर, रविराज काळे, दीक्षा पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.