मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (09:51 IST)

महाराष्ट्रात शाळा आजपासून सुरू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी केली 'ही' सूचना

school repoen
विदर्भ वगळता महाराष्ट्रातील सर्व शाळा आजपासून सुरू होत आहेत. दोन वर्षांनंतर शाळेचं शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होत आहे.
 
कोरोना आरोग्य संकटात शाळा बंद असल्यामुळे शालेय शिक्षणावर मोठा परिणाम झालाय. यंदा नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरू होत असल्याने आगामी काळात शालेय शिक्षण पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 
शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 13 जूनला आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी सूचना केली आहे.
 
शाळांसाठी नियम
राज्यात काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. विशेषत: मुंबई, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.
 
या पार्श्वभूमीवर शाळांनी कोव्हिडसंदर्भातील सर्व नियम आणि निर्बंधांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं शिक्षण आयुक्तांनी सांगितलं आहे.
 
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं अनिवार्य आहे. तसंच बूस्टर डोससाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करायचे आहे.
 
10 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करायचे आहे.
 
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
 
वाढत्या रुग्णसंख्येमुळे लगेच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही, असं वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.
 
त्या म्हणाल्या होत्या, "13 जूनला इयत्ता पहिलीसाठी 'पहिलं पाऊल' हा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होतील. सध्या मास्क बंधनकारक नाही. येत्या काळात कोव्हिडची परिस्थिती पाहून शाळांसदर्भात निर्णय घेतला जाईल."
 
दरम्यान, काही खासगी शाळांनी खबरदारी म्हणून मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. तर काही शाळा सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची वाट पाहत आहेत.
 
महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते संजय डावरे यांनी सांगितलं, "13 तारखेपासून आम्ही शाळा सुरू करत आहोत. दोन वर्षांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल अशी आम्हाला आशा होती. शिक्षकांमध्येही उत्साह आहे. परंतु आता काही ठिकाणी रुग्ण वाढत असल्याने थोडी खबरदारी घ्यावी लागेल.
 
"आम्ही विद्यार्थ्यांना मास्क घालून येण्याचे आवाहन करत आहोत. सरकारने लवकरात लवकर सूचना द्याव्यात जेणेकरून शाळांनाही तयारी करायला वेळ मिळेल."
 
पहिल्या दिवशी 'आनंदोत्सव'
या आठवड्यात शाळा पुन्हा गजबजणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. एका मोठ्या काळानंतर विद्यार्थी शाळेत येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी आणि त्यांनी आनंदात शाळेत यावं यासाठी 13 जूनला 'आनंदोत्सव' हा कार्यक्रम शाळांमध्ये केला जाईल.
 
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. शाळा सुरू होणार या निमित्ताने त्यांनी महत्त्वाच्या घडामोडींची माहिती दिली आहे.
 
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची सूचना त्यांनी केली आहे. तसंच प्रत्येक शाळेत 'सखी सावित्री समिती' गठीत केली जाणार आहे.
 
दरम्यान, कोरोना काळात मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून मोहीम राबवली जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी काम करावे, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
 
दोन वर्षांत किती विद्यार्थी शाळाबाह्य?
नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.
 
शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
 
लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होत्या. या काळात स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत दाखल मुले व शाळाबाह्य मुले यांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.
 
शाळाबाह्य, स्थलांतरित, अनियमित मुलांची नोंदणी आणि शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'बालरक्षक' ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.
 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी राज्यात कधीच शाळेत न गेलेल्या 6 ते 14 वयोगटातील बालकांची संख्या 7,806 होती. यापैकी 4,076 मुले आणि 3,730 मुलींचा समावेश होता.
 
तर अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या 17 हजार 397 आहे. यामध्ये 9,008 मुले तर 8,389 इतक्या मुली आहेत.
 
दोन्ही मिळून ही संख्या 25 हजार 204 इतकी आहे. यापैकी विशेष गरजाधिष्ठित असलेल्या बालकांची संख्या 1,212, बालकामगार म्हणून काम करीत असलेल्या बालकांची संख्या 288 तर अन्य कारणांमुळे शाळाबाह्य होणाऱ्या बालकांची संख्या 23 हजार 704 इतकी आहे.