जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या
नाशिक शहरातील त्र्यंबकरोडवर असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी परिचारिकेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या परिचारिकेने जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या परिचारिकेने रात्रीच्या सुमारास राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. माधुरी काशिनाथ टोपले वय १९ असं या आत्महत्या केलेल्या परिचारिकेचे नाव समोर आले आहे. माधुरी या मूळच्या सुरगाणा तालुक्यातील वांगणसुळे येथील असल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी आत्महत्येची ही घटना उघडकीस आली. ही परिचारिका शासकीय रुग्णालयाच्या लगतच असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. या महाविद्यालयाच्या बाजूलाच मुलींचे वसतिगृह आहे. तिथे ही परिचारिका राहत होती. दरम्यान, तिने आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक (surgeon) डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधाडिया, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. निखिल सैदाणे, अधीसेविका शुभांगी वाघ हे तातडीने दाखल झाले. सरकारवाडा पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या परिचारिकेच्या खोलीतील वस्तूंची तपासणी केली जात आहे. तसेच काही चिट्ठी वगैरे लिहून ठेवली आहे का, याची तपासणी चालू आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे वसतीगृहातील विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली आहे.