1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (14:50 IST)

“धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचं असून शिवसेनेकडेच राहणार आहे,” --संजय राऊत

sanjay raut
नाशिक शहर आणि जिल्हा कायमच बाळासाहेबांच्या मागे उभा राहिला आहे. त्यामुळे शिवसेना नाशिकमध्ये जशी होती, तशीच राहिलेली आहे. नाशिक ग्रामीण भागाचा विचार करता काही पदाधिकारी बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खा. राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. तीन दिवसांच्या या दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की, शिवसेना ही जागेवरच आहे. भाजपाच्या राजकीय डावपेच्यामुळे शिवसेनेत लढाई सुरु करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसैनिकालाच शिवसैनिकाच्या विरोधात लढण्याची भाजपाची ही रणानिती आहे. कारण भाजपाला शिवसेना ही पूर्णपणे संपवायची आहे आणि शिवसेना संपली तर भाजपाला राज्याचे तीन तुकडे करणे सोपे होणार आहे.
“धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचं असून शिवसेनेकडेच राहणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. बंडखोर आमदार तुम्हाला टार्गेट करत असून तुमच्यामुळे शिवसेना संपत असल्याची टीका करत आहेत असं विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, “भाजपाने माझ्यावरचं बोलणं थांबवलं आहे, त्यांना आता ४० नवीन भोंगे मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं हे महाराष्ट्र जाणतो”.
विशेष करून भाजपाला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची असल्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर धनुष्यबाण आमचे, मातोश्री आमची, शिवसेना आमची असे म्हणण्यापेक्षा जर बाहेर पडले आहातच तर स्वतःच काहीतरी निर्माण करा असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना यावेळी लगावला.
सध्या भाजपाकडून माझ्यावर कोणतेही वक्तव्य होत नसले तरी भाजपाला आता नवीन 40 भोंगे माझ्यावर आरोप करण्यासाठी मिळाले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. नव्याने स्थापन झालेले हे सरकार झुंडशाहीतून निर्माण झालेले सरकार आहे. राज्यपालांनी घटनाबाह्य पद्धतीने हे सरकार निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच नाशिक मधले सर्व नगरसेवक पदाधिकारी हे शिवसेनेसोबतच असल्याचा उल्लेख त्यांनी केला. उद्या होणाऱ्या मेळाव्यात सर्वच जण आपणास दिसतील यात शंका नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.