शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (08:13 IST)

‘गाव विकणे आहे’,गावकऱ्यांनी चक्क गाव काढले विक्रीला

village
नाशिक : देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी थेट शेतजमीन सह गाव गाव विक्रीला काढले आहे. पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे अवघड झाल्याने या गावातील शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांकडून विविध प्रकारे रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले आहे.
 
गेल्या ३ ते ४ वर्षापासून शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतऱ्यांच्या लाख मोलाच्या पिकांचे आणि स्वप्नांची अक्षरशः होळी झाली आहे. सध्या कांद्याचे भाव शेतकऱ्यांचा बेसिक खर्च निघेल एवढे सुद्धा नाहीये. दरम्यान नाशिकच्या देवळा तालुक्यातील माळवाडी आणि फुले माळवाडी येथील जवळपास सर्व शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय कांदा असून त्यावर आपला उदरनिर्वाह भागात असून पुढील स्वप्न देखील बघत आहेत. परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसलेल्या शेती करण्यात अर्थ काय असा थेट ग्रामस्थांनी सरकारला केला आहे. तर ठरावात थेट गाव विक्रीसाठी काढले असून सरकारने ते गाव विकत घ्यावे असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्याची निराशा आणि रोष दिसत आहे.
 
यासंदर्भात सोमवारी (दि.६) गावातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. ५३४ हेक्टरवर माळवाडी गावात शेतकरी शेती व्यवसाय करत असून त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी म्हणून प्रमुख कांद्याचे पिक घेतले जात आहे. यामधील कोणत्याही शेती उत्पादित मालाला गेल्या ३ ते ४ वर्षापासून योग्य तो भाव मिळत नाही. विशेष म्हणजे गावातील ९५ टक्के शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहेत. तर माळवाडी आणि फुलेमाळवाडी गांवासह देवळा तालुक्यातील शेतकरी कांदा या प्रमुख पिकावर आपला उदरनिर्वाह करतात. गावात शेतीवर आधारित असलेली कुटुंब आहेत.आरोग्य, शिक्षण, लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही शेतकऱ्यांना शेती व्यवसायात उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी/गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
 
आधी होळी आता गाव विक्री..कांद्यामुळे शेतकरी संतप्त
कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे त्याला होळी सणाच्या दिवशी कांद्याची होळी करण्यात आली. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव नसल्यामुळे कांद्याची होळी केली. पीक उभे करायला आणि ते तयार करायला अफाट खर्च आला. मात्र त्याला विकून हातात काहीच उरत नसल्याने शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याची होळी केली आहे. तर आता नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी गाव विकण्यास काढले आहे.