बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (08:41 IST)

लोकसभा मतदार यादीत नाव नाही तर १७ मतदारसंघात नोंदणीची ही आहे शेवटची तारीख

तुम्ही लोकसभा निवडणूक कोण जिंकणार यावर बोलत आहेत. तुम्ही नरेद्र मोदी राहुल गांधी यांच्यावर बोलत आहात, तुम्ही कोणत्यातरी एका पक्षाला जास्त प्राधान्य देतात, तर मग तुम्ही नक्की मतदान करणार असाल. जर तुम्ही मतदान करणार नसाल आणि तुमचे नाव यादीत नसेल तर तुमच्या बोलण्याला कोणतीही किंमत नाही, होय अजूनही वेळ गेली नाही लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेत फक्त बोलून चालत नाही तर मतदान देखील करावे लागते यासाठी आता शेवटची तारीख आली आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदार नाव नोंदणीची अंतिम संधी 30 मार्च 2019 पर्यंत आहे. यामध्ये मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मतदार संघाबरोबरच राज्यातील इतर अकरा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून ज्या नागरिकांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदवलेले नाही त्यांना ते नोंदविण्याची अखेरची संधी मिळणार आहे.
 
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. चौथ्या टप्प्यातील अधिसूचना 2 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल आहे. या टप्प्यात मुंबईमधील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य,मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी या मतदारसंघातील मतदानाचा समावेश आहे.
 
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी दहा दिवस अगोदर पर्यंत नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी करता येते. त्यानुसार चौथ्या टप्प्यातील मतदार संघातील नागरिकांना यादीत नाव नोंदणीसाठी 30 मार्च ही अंतिम तारीख आहे. मतदार छायाचित्र ओळखपत्र असले तरी मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी. तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घ्यावी.
 
चौथ्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या मतदारसंघातील मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करण्यासाठी 30 मार्च पर्यंत www.nvsp.in किंवा संबंधित जिल्ह्यातील निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात नमुना क्र. 6 भरून द्यावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.