1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2024 (16:23 IST)

'युक्रेन युद्ध थांबवणारे देशातली पेपरफुटी थांबवू शकत नाहीत', UGC-NET प्रकरणावरून राहुल गांधींची टीका

मंगळवारी (18 जून) घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) रद्द करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान अनियमितता समोर आल्यानंतर याप्रकरणी निर्णय घेण्यात आला आहे.
 
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. NTA च्या वतीनं ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यात जवळपास नऊ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली होती.
 
गेल्या काही दिवसांपासून NEET परीक्षांसंदर्भातील मुद्दा चर्चेत असतानाच, आता सरकारला पुन्हा NET परीक्षाही रद्द करावी लागली आहे.
 
दरम्यान, हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडं सोपवण्यात आलं आहे.
 
उमेदवारांना UGC-NET या परीक्षेच्या माध्यमातून रिसर्च फेलोशिप, पीएचडी आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता मिळवता येते.
 
मंत्रालयाने काय म्हटले?
सरकारनं काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये 18 जून रोजी OMR पद्धतीनं घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
 
या प्रसिद्धीपत्रकानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाला सायबर गुन्हे खात्याकडून 19 जून रोजी म्हणजे परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी काही महत्त्वाची माहिती मिळाली होती.
 
या परीक्षांचं आयोजन करताना तिच्या पावित्र्याशी काहीतरी तडजोड झाली असल्याचं या माहितीवरून प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
 
परीक्षेमध्ये पारदर्शकता असावी आणि परीक्षा प्रक्रियेचं पावित्र्य राखलं जावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
 
प्रसिद्धी पत्रकात NEET चाही उल्लेख
गेल्या काही दिवसांपासून NEET परीक्षा आणि त्यातील ग्रेस मार्कच्या मुद्द्यावरूनही गोंधळ उडालेला पाहायला मिळाला आहे. त्याबाबतही या प्रसिद्धीपत्रकात उल्लेख करण्यात आला आहे.
 
या प्रकरणी ग्रेस मार्कच्या संदर्भात समोर आलेली समस्या हाताळली असून, त्यावर तोडगा काढण्यात आल्याचं यात म्हटलं आहे.
 
पाटण्यात आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत काही अनियमितता झाल्याच्या आरोपांनंतर बिहार पोलिसांकडून याबाबत सविस्तर अहवाल मिळाला आहे.
 
त्यावर हा अहवाल मिळाल्यानंतर कारवाई करणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. यात कोणीही दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
 
निर्णयानंतर सरकारवर टीका
NET परीक्षा रद्द झाल्यानंतर या मुद्द्यावरून सरकारवर विरोधकांकडून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे.
 
मोदी सरकार तरुणांच्या भवितव्याशी खेळत असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
"देशाच्या विविध भागांत काल UGC-NET परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आज पेपर लीकच्या संशयात परीक्षा रद्द करण्यात आली. आधी NEET चा पेपर लीक झाला आणि आता UGC-NET चा. मोदी सरकार- 'पेपर लीक सरकार' बनलं आहे," असं काँग्रेसनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे.
 
"अबकी बार, पेपर लीक सरकार," असं म्हणत अखिलेश यादव यांनी हे सरकार अवघ्या काही दिवसांचे पाहुणे असल्याचं एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
'युद्ध थांबवण्याचा दावा करणारे पंतप्रधान देशातली पेपरफुटी थांबवू शकत नाहीत'
पेपरफुटीबाबत बोलताना काँग्रेसचे नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, "भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त आम्ही मणिपूर ते महाराष्ट्र असा प्रवास केला. या प्रवासात हजारो तरुणांनी पेपरफुटीबाबत चिंता व्यक्त केली होती. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की नीट (NEET) आणि युजीसी-नेट (UGC-NET) या दोन महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटले आहेत. यातला एक पेपर रद्दही करण्यात आला आहे.
 
असं म्हटलं जात होतं की नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवलं होतं. नरेंद्र मोदींनी इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्ध देखील थांबवल्याचं सांगितलं गेलं.
 
पण आपल्या देशात पेपर लीक होण्याचे जे प्रकार घडत आहेत त्यांना थांबवण्यात मात्र नरेंद्र मोदी एकतर अपयशी ठरले आहेत किंवा त्यांना ही पेपरफुटीची प्रकरणं थांबवायची इच्छाच नाही असं दिसतंय."
 
पेपरफुटीबाबत भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, "मध्यप्रदेशात झालेला व्यापम घोटाळा नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार संपूर्ण देशभरात पसरवण्याचं काम करत आहे.
 
पेपर फुटण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की सगळ्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांवर भाजप आणि भाजपची पितृसंस्थेने ताबा मिळवला आहे.
 
सगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांचेच कुलगुरू आहेत. जोपर्यंत हा ताबा हटत नाही तोपर्यंत पेपर लीक सुरूच राहतील. पेपरफुटी ही देशविरोधी घटना आहे कारण देशातल्या तरुणांच्या भविष्याशी अशा पद्धतीने खेळलं जात आहे."
 
काय आहे NTA?
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून देशपातळीवरील पात्रता परीक्षांचं आयोजन करण्यासाठी NTA (National Testing Agency) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
 
नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर चाचणीची तयारी, आयोजन आणि त्याच्या मार्किंगसंदर्भातील संपूर्ण तयारी अंमलबजावणी आणि समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 
आंतरराष्ट्रीय मानकं, कार्यक्षमता आणि पारदर्शकपणे प्रवेश प्रक्रिया आणि भरतीसाठी उमेदवारांचं मूल्यांकन करण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून केलं जातं.
 
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या माध्यमातून उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश/फेलोशिपसाठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यात NEET आणि NET या परीक्षांसह इतर परीक्षांचा समावेश असतो.
 
Published By- Dhanashri Naik