जलसंपदा विभागातील भरतीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मोठी घोषणा
राज्यात जलसंपदा विभागात 4 हजार 75 पदे रिक्त असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 करिता विभागा कडून पाठविण्यात आलेल्या 581 पदांकरिता ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 करिता 117 पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. पण या परीक्षांमधून आयोगास अद्याप उमेदवारांच्या शिफारशी विभागाकडे प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांसाठी एप्रिल 2022 मध्ये जलसंपदा विभागातील विविध रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पैनगंगा नदीवरील निम्न पैनगंगा प्रकल्पाकरिता 2009 साली सुधारित प्रशाकीय मान्यता देण्यात आली होती. आता प्रकल्पातील त्रुटी पुर्ततेची कार्यवाही सुरू आहे.
या प्रकल्पाची किंमत जास्त असल्याने त्याचे टप्पेनिहाय नियोजन करण्यात आले असून यासंदर्भात फेर निविदेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात या प्रकल्पातील अडचणी दूर करत निविदा काढून गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास, प्रकल्प पूर्ण करण्यास 90% अनुदान मिळू शकणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 2 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेतकरी सुखावणार असल्याचे मत मंत्री श्री.पाटील यांनी व्यक्त केले. या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता.