गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (12:46 IST)

गारपीट म्हणजे काय, ती ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते?

garpit ole
अभिजित घोरपडे
BBC
राज्याच्या काही भागात गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंतय.
 
पावसाळ्यात गारपीट होणं आपल्यासाठी सवयीचं. पण, उन्हाळ्यात गारपीट होण्याचं प्रमाण का वाढलं आहे? यामागची कारणं काय हे आपण आता समजून घेणार आहोत.
 
काही वर्षांपूर्वी कदाचित वाटलं असतं हे असं कसं? पण 2014 साली मार्च महिन्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट झाली, पुढच्याही वर्षी हवामानाने तोच कित्ता गिरवला. त्या कालावधीत राज्याच्या अनेक भागात इतकी गारपीट होती झाली की गारांचा दीड-दीड फुटांचा थर साचला होता.
 
पिकांची हानी, घरांचं नुकसान, जनावरांचा मृत्यू असं मोठं नुकसानही झालं होतं. या गारपिटीबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. एक ना दोन.. अनेक प्रश्न विचारले जात होते, शंका उपस्थित केल्या जात होत्या. जमेल तशी कारणं दिली जात होती.
 
पण आता वारंवार असं होऊ लागल्याने लोकही त्याला जणू सरावलेत. त्यामुळे आता गारपीट झाली तरी 'असं होतंच बुवा..' म्हणून सोडूनही देतील. तरीसुद्धा त्याच्या मुळाशी जावंच लागेल.
 
राज्यात गारपीट कधी होते?
गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा.
 
विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.
garpit ole
BBC
हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.
 
बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर.
 
ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.
 
गारा घडताना
या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.
हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.
 
हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं.
 
पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.
 
गारेच्या अंतरंगात डोकावताना
प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात.
 
एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो.
 
गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते.
 
आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.
 
एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं.
 
ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन.
 
एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो.
 
हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!

Published By -Smita Joshi