बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (09:44 IST)

मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरेंच्या वक्तव्याचे अर्थ काय? कशी असणार मविआ-महायुतीची गणितं?

महाराष्ट्रात सरकारचा कार्यकाळ येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत संपणार असल्याने आगामी तीन महिने महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.
 
यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, निवडणूक चिन्ह आणि पक्षासाठीच्या कायदेशीर लढाईनंतर आता या निवडणुकीत खऱ्या अर्थानं जनतेचा कौल काय हे समोर येणार आहे.
 
त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण जागा वाटप आणि सगळ्यात कळीचा मुद्दा असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अस्पष्टता कायम आहे.
 
महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपलं वर्चस्व असलेल्या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर महायुतीतही भाजपकडून मित्र पक्षांसाठी किती जागा सोडल्या जाणार यावरून मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
 
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसमोर जाहीर सभेतच मुख्यमंत्री पदाच्या फाॅर्म्युल्याबाबतचं मत अगदी स्पष्टपणे मांडलं.
 
उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासमोर एक नवीन पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे.
 
तर दुसरीकडे महायुती सरकारचे मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे असले तरी महायुतीकडूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित झालेला नाही.
 
यामुळे विधानसभा निवडणुकीचं राजकीय युद्ध जिंकण्यासाठी मविआ आणि युतीने कंबर कसली असली तरी जागावाटप आणि मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर कायम आहे.
 
काँग्रेस, राष्ट्रवादीची अडचण?
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आणि विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा शुक्रवारी (16 ऑगस्ट) मुंबईत पार पडला.
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, असे महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तसंच सीपीआय, सीपीएम, शेकाप असे मविआतील छोट्या पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा यावेळी हजर होते.
 
उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मित्र पक्षांसाठी काम करण्याची सूचना तर केलीच पण सोबत भर सभेत आघाडीतल्या प्रमुख नेत्यांना मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिकाही बोलून दाखवली.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, “शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करा, मी त्याला पाठींबा देतो. कारण मी माझ्यासाठी ही निवडणूक लढवत नाही."
 
पण ठाकरे केवळ इतकंच बोलून थांबले नाहीत, तर ते पुढं म्हणाले की,"युतीत घेतलेला अनुभव आम्हाला पुन्हा नकोय. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण युतीत होतं. त्यामुळं लोक एकमेकांच्या जागा पाडण्यासाठी काम करतात. पाडापाडी होते. हे आम्हाला नकोय. काय ते आत्ताच ठरवा आणि चला पुढे."
 
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ताच ठरवा असं आवाहन जाहीर सभेत केल्याने शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोरही मोठा प्रश्न उभा राहिला.
 
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाषणात याला उत्तर देत,"मुख्यमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. ते निर्णय घेतील," असं म्हणत हात झटकले आहेत.
 
आतापर्यंत आघाड्यांमध्ये ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र साधारणपणे असायचं. मविआमध्येही विधानसभेला ज्याच्या जागा जास्त येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असं सूत्र ठरण्याची शक्यता होती.
 
पण उद्धव ठाकरे यांनी यामुळं आमदार पाडापाडीचं राजकारणच जास्त होईल अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री पदाचा चेहरा मविआचे नेते कसा ठरवणार असा पेच निर्माण झाल्याचं समोर येत आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी भाषणात विविध योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे असल्याचं सांगत अधिकारी त्यांना फोन करतात असंही सांगून टाकलं.
 
"लाडकी बहीण घोषणा केलीय पण पैसे कुठून आणायचे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीच चीडचीड चालली आहे. आयएएस अधिकारी मला म्हणतात तुम्ही लवकर या," असं ठाकरे म्हणाले.
 
शरद पवार यांनी मात्र जागा वाटप आणि मुख्यमंत्री पद या दोन्ही विषयांवर भाष्य करणं टाळलं. भाषणात त्यांनी संविधान बदलाचा धोका आणि जनसुरक्षा विधेयकातील जाचक तरतूदी यावर भर दिला. परंतु मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही.
 
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, "उद्धव ठाकरे यांनी सभेत हे भाष्य करून एकप्रकारे गुगली टाकून पाहिली आहे असं वाटतं. लोकसभेला त्यांच्या चेहर्‍यामुळे मविआच्या जागा आल्या असंही त्यांचं मत असावं किंवा त्याचा फायदा ते करून घेत असावेत.
 
एकत्रित नेतृत्त्वाअंतर्गतच निवडणूक लढवावी असं शरद पवार यांचं मत आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा होता. पण काँग्रेस हायकमांडनेही याबाबत काही सकारात्मक कौल दिला नाही अशी माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्वांसमोर मेळाव्यात हे भाष्य केलं."
 
"यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या घडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनेल किंवा त्या एका नेत्याच्या चेहऱ्याने मविआ मतं मिळवू शकेल असं त्यांच्याकडे कोणी नाही.
 
त्यामुळं उद्धव ठाकरे म्हणाले की, आत्ताच स्पष्ट करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा. कारण जसा शिवसेनेकडे उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा आहे तसं इतर दोन पक्षाची परिस्थिती नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती होऊ शकते असा त्यांचा प्रयत्न असावा."
 
परंतु लोकसभेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा परफाॅरमन्स पाहता त्यांची तडजोड करण्याची तयारी नाही असे दिसते. त्यामुळे निवडणुपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल असं वाटत नाही, असंही सूर्यवंशी म्हणाले.
 
मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला गृहीत धरू नका असा एकप्रकारे इशारच दिलाय असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटतं. ते म्हणाले,"उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीत काँग्रेस हायकमांडने प्रचार प्रमुख म्हणून निश्चित करतो असा प्रस्ताव दिला परंतु मुख्यमंत्री म्हणून नाही. म्हणून मला जाहीर करत नसाल तर तुम्ही तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा असं आता उद्धव ठाकरे म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांनी गृहीत धरू नका असा एक इशारा दिला आहे असं मला वाटतं."
 
महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार?
महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये आतापर्यंत जागा वाटपासाठी काही मोजक्याच बैठका पार पडल्या आहेत.
 
नुकताच उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौराही केला. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
 
आतापर्यंत विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवत आलेली आहे. परंतु आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने जागांचं गणित कसं जुळवायचं हे आव्हान नेत्यांसमोर कायम राहणार आहे.
 
आतापर्यंत झालेल्या बैठका आणि मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस सुमारे 150 जागा लढविण्यास इच्छुक आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने 120-130 जागांची मागणी केल्याचं समजतं. शरद पवार यांच्याकडून मात्र अद्याप कोणताही आकडा समोर ठेवण्यात आलेला नाही अशीही माहिती आहे.
 
2019 मध्ये काँग्रेसने 147 जागा लढवल्या आणि 43 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागा लढवल्या होत्या ज्यापैकी त्यांच्या 54 जागा निवडून आल्या. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीसोबत 2019 मध्ये 124 जागा लढवल्या होत्या आणि 56 जागांवर त्यांना विजय मिळवता आला.
 
गेल्या दोन वर्षांत राज्यातील दोन पक्षाचे चार पक्ष झाले. शिवसेनेचे 39 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. यामुळे दोन्ही पक्षांना आपल्या मतदारसंघात निवडून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करावी लागत आहे.
 
तसंच लोकसभा निकालाची गणितंही पक्ष विचारात घेतली जातील. यामुळं 2019 च्या निकालापेक्षा सद्यस्थितीनुसार जागा वाटप ठरवण्याकडं मविआचा भर आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या मते, "लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस जास्त किंवा बरोबरीच्या जागांसाठी आग्रही असेल. तसंच शरद पवारही. लोकसभेला आम्ही दोन पावलं मागे आलो होतो पण तसेच राहू असं नाही असं म्हणाले आहेत. यामुळं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समसमान जागा किंवा निवडून येणाऱ्या जागांनुसार निर्णय घ्यावे लागतील नाहीतर शेवटच्या क्षणापर्यंत काही जागांवरून रस्सीखेच सुरू राहील."
 
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झुकतं माप देण्यात आलं. मुंबई, सांगली, भिवंडी, वर्धा अशा जागाही काँग्रेसला शिवसेनेसाठी सोडाव्या लागल्या.
 
पण निकालातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट पाहता विधानसभेसाठी हे दोन्ही पक्ष तडजोड करतील अशी परिस्थिती नाही, असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे मांडतात.
 
त्यांच्या मते, "शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2019 मध्ये त्यांच्या निवडून आलेल्या सर्व जागांसाठी आग्रही असतील. तीन पक्षाचे मिळून 150 जागांचा निर्णय होईल. आता जवळपास 138 जागांसाठी काँग्रेस ताकद लावेल असं दिसतं. यावेळी काँग्रेस जागांसाठी आग्रही असेल. विशेषतः मुंबईसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच पहायला मिळेल."
 
महायुतीचे गणित काय?
महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांनाही समाधानकारक जागा वाटप निश्चित करणं किंवा त्यासाठी फाॅर्म्युला ठरवणं तितकसं सोपं नाही.
 
2019 मध्ये भाजपने 164 जागा लढवल्या आणि 105 जागा निवडून आल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर आणि पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि आजित पवार यांच्यासोबत आताच्या घडीला बहुसंख्य आमदार असले तरी जागा वाटपादरम्यान किती आमदार सोबत राहतात किंवा आमदार कायम राहतात का हे पहावं लागेल.
 
महायुतीतील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपासाठी आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र दिल्ली दौरे सुद्धा केले.
 
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने 100 जागा लढवण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी शिंदे गट आग्रही आहे. तर भाजप 160-165 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहे.
 
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिंदेंच्या शिवसेनेला 100 जागा तरी मिळायला हव्यात असं जाहीर वक्तव्य केलं होतं. 100 पैकी 90 जागा आम्ही निवडून आणू असंही ते म्हणाले होते.
 
तर अजित पवार ज्यांनी राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू करत प्रचाराचा नारळ फोडला आहे. अजित पवार गट 80 ते 90 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यासंदर्भात भाष्य केलं होतं. पक्षाला 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत असं ते म्हणाले होते.
 
भाजपचे 105 आमदार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर आमदार असे 115 साधारण आमदार आहेत. तर अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार आहेत. आणि शिवसेनेकडे त्यांचे 39 आणि इतर मिळून साधारण 50 आमदार आहेत. यामुळे 200 जागांचं वाटप करण्यात युतीत अडचण येणार नाही असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे मांडतात.
 
ते म्हणाले, "उर्वरित 80-90 जागांसाठी महायुतीला जागा निश्चित करायच्या आहेत. यात निवडून येणाऱ्या सूत्रानुसार जागा ठरू शकतात किंवा शिवसेना, राष्ट्रवादीला समान जागा दिल्या जाऊ शकतात."
 
महायुतीच्या जागा वाटपाच्या गणिताबाबत बोलताना सुधीर सूर्यवंशी म्हणाले की, "महायुतीमध्येही हा तिढा आहे.
 
भाजपने शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणूक लढण्याचं जरी मान्य केलं तरी ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं नाही. आधीच राज्यात भाजपची 23 वरून 9 खासदार अशी अधोगती होताना दिसत आहे. त्यांचा मुख्यमंत्री बनत नसेल तर पुन्हा लहान भावाच्या भूमिकेत जातील हा धोकाही आहेत.
 
दुसरीकडे अजित पवार यांची अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा आहे. युतीमध्ये ते किंगमेकरच्या भूमिकेत आले किंवा तेवढे त्यांचे आमदार आले तर अजित पवार सुद्धा अटी समोर ठेवतील."
 
सूर्यवंशी यांच्या मते," जागा वाटपातही भाजपच दोन्ही मित्र पक्षांच्या जागा ठरवेल. तसंच भाजपच सर्वाधिक जागा लढवेल यात शंका नाही. यानंतर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ते किती जागा देतात यावर युती निवडणूक कशी लढवणार हे अवलंबून आहे.
 
लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा निवडून आणता आली. यामुळे विधानसभेला जागा देताना भाजप श्रेष्ठी हा विचारही करतील. युतीत कोणाला जास्त तडजोड करावी लागते ते पहावं लागेल."
 
यामुळं आगमी दोन महिने हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पुन्हा अत्यंत महत्त्वाचे असतील. या दरम्यान पुन्हा काही पक्षांतरं होतील याचीही शक्यता नाकारता येत नाही. परंतु विधानसभेचा हा सामना आघाडी विरुद्ध युती असाच थेट असेल यात शंका नाही.

Published By- Dhanashri Naik