सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:25 IST)

राज ठाकरे यांनी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पत्र का लिहिले ?

भारतीय रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. कर्जवसुली करताना बॅंका, एनबीएफसी, पतसंस्था आदी सर्व वित्तीय संस्थांनी कायदेशीर प्रक्रियेचंच पालन करावं आणि आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झालेल्या वाहतूक व्यावसायिकांना या कठीण काळात ठोस आर्थिक दिलासा द्यावा, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर आपला वचक ठेवावा आणि याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी  भारतीय रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पत्र लिहिलं आहे.  मनसेचे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी या पत्रासंदर्भात फेसबुकवरुन माहिती दिली आहे.
 
देशातील वाहतूक व्यावसायिकांच्या तक्रारी समजून घेऊन खाजगी बँका, एनबीएफसी आदी वित्तीय संस्थांवर वचक ठेवण्याबाबत, असा आपल्या पत्राचा विषय असल्याचं राज यांनी पत्रात नमूद केलं आहे. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात ६.३ टक्के वाटा असलेल्या वाहतूक क्षेत्रात कृषी क्षेत्रानंतरची सर्वाधिक रोजगारनिर्मिती होते, मात्र करोना संकटकाळामुळे या क्षेत्रातील लहान-मोठे व्यावसायिक तसंच त्यांच्यावर अवलंबून असलेले घटक आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाले आहेत, असं राज यांनी पत्राच्या विषयासंदर्भातील सुरुवातीची मांडणी करताना म्हटलं आहे. अशा आर्थिक परिस्थितीत वाहतूक क्षेत्राला आर्थिक दिलासा कसा देता येईल, याबाबत देशातील बॅंकिंग व्यवस्थेने काही तोडगा काढणे गरजेचे होते. प्रत्यक्षात बॅंकिंग व्यवस्था अत्यंत निष्ठूरपणे वाहतूक व्यावसायिकांचं आर्थिक शोषण करत असल्याचं दिसत आहे आणि म्हणूनच तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असंही राज यांनी म्हटलं आहे.