सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (16:06 IST)

अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार का?

मयांक भागवत
मनी लाँडरिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी (29 जून) ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहेत. तेव्हा अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहतात की नाही याकडे अनेकांचे लक्ष आहे.
 
ईडीने चौकशीसाठी अनिल देशमुख यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे.
 
ईडीने शुक्रवारी (26 जून) अनिल देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं. मात्र, चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी देशमुख यांनी ईडीकडे केली होती.
 
मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांचे दोन स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना 25 जून रोजी अटक केली आहे.
 
त्यामुळे अनिल देशमुख आज (29 जून) चौकशीसाठी हजर राहतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
दरम्यान, अनिल देशमुख अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करतील, अशी चर्चादेखील सुरू आहे.
 
'माझ्याविरोधात हे कारस्थान रचण्यात आलं आहे'
अनिल देशमुख यांच्या सचिवांना कोर्टासमोर हजर केल्यानंतर ईडीने कोर्टात अनिल देशमुख मनी लॅांडरिंगमध्ये सहभागी आहेत असा आरोप केला होता.
 
अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की "माझ्याविरोधात हे कारस्थान रचण्यात आलं आहे. मी एक कायदा पाळणारा नागरिक असून याआधी देखील मी चौकशीला पूर्ण सहकार्य केलं आहे. यापुढेही करत राहीन."
 
'ऑडिओ किंवा व्हीडिओच्या माध्यमातून सदैव हजर राहू शकतो'
 
अनिल देशमुख यांनी पत्रात लिहिलं आहे की,
 
"माझं वय 72 वर्षे आहे आणि उच्चरक्तदाब, हृदयाचा त्रास यांसारख्या आजारांशी सुद्धा लढतोय. 25 जून 2021 रोजीच मी तुमच्या समोरासमोर काही तास माझा जबाब नोंदवला. त्यामुळे आज (29 जून) कदाचित मी स्वत: येऊ शकत नाही. माझ्या अधिकृत प्रतिनिधीला पाठवत आहे.
 
"तुम्हाला नेमकी कोणती कागदपत्रं आणि माहिती हवी आहे, हे कळल्यावर मी ती सर्व माहिती आणि कागदपत्रे तुम्हाला देईन. ECIR ची प्रत माझ्याकडे नसल्यानं मी आवश्यक कागदपत्र देण्यास असमर्थ ठरतोय.
 
"ऑडिओ किंवा व्हीडिओच्या माध्यमातून मी कधीही तुमच्यासाठी तुमच्या वेळेनुसार उपलब्ध असेन.
 
"25 जूनच्या समन्सचं पालन करूनही, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केले जातायेत की, मी हजर राहण्यासाठी वेळ मागून घेतोय.
 
"मी लोकप्रिय नेता आहे. माझं पूर्ण आयुष्य मी सार्वजनिक क्षेत्रात घालवलं आहे," असं देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे.
 
अनिल देशमुख यांच्याविरोधात 11 मे रोजी चौकशीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
"आम्हाला कागदपत्र मिळाली तर अनिल देशमुख चौकशीला हजर राहातील," असं अनिल देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी म्हटलं आहे. "अनिल देशमुख अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणार नाहीत," असं देखील सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
 
ईडीचे आरोप काय आहेत?
हे प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांची बदली, पोस्टिंग आणि बार मालकांकडून पैसे घेतल्यासंदर्भात असल्याची माहिती ईडीने कोर्टात दिली होती.
 
ईडीने रिमांड अर्जात दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बार मालकांचे जबाब नोंदवण्यात आले. बार मालकांनी गुड लक मनी म्हणून सचिन वाझेंना 40 लाख रुपये दिले होते. हे पैसे नंबर '1' ला देण्यात येणार होते. पण हा नंबर '1' कोण याचा खुलासा ईडीने अद्यापही केलेला नाही.
 
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, बार मालकांकडून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये 4.70 कोटी रुपये घेण्यात आले. मुंबईतील बार सुरळीत पद्धतीने सुरू राहावा, यासाठी सचिन वाझेंना पैसे देण्यात आले होते.
 
अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले. त्यांनी हा पैसा दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून साई शिक्षण संस्थेकडे वळवला, असा ईडीने आरोप केलाय.
 

सचिन वाझेंनी जबाबात काय म्हटलंय?
ईडीने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी त्यांनी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला आहे.
 
सचिन वाझेंनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पैसे गोळा करून कुंदन शिंदे यांना दिले होते.
 
पैसे हवालाच्या माध्यमाने अनिल देशमुख यांच्या संस्थेत पोहोचले?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी मिळण्यासाठी कोर्टात दाखल रिमांड रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, हवालाच्या मदतीने बारमालकांकडून मिळालेला पैसे अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत डोनेशन म्हणून देण्यात आला.
 
ईडीच्या दाव्याप्रमाणे, श्री साई शिक्षण संस्थेच्या बॅंक स्टेटमेंटचा अभ्यास केला असता, गेल्या काही काळात 4 कोटी 18 लाख रुपये या संस्थेला दिल्लीच्या विविध कंपन्यांकडून मिळाल्याचं समोर आलं.
 
या कंपन्या फक्त पेपरवर आहेत आणि ट्रान्सफर एन्ट्री करण्याचे काम करतात, असं ईडीने कोर्टात सादर आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
या कंपनीतील एका संचालकाने ईडीला दिलेल्या जबाबात सांगितलं की, नागपूरच्या एका व्यक्तीने हे पैसे श्री साई शिक्षण संस्थेला दान करायचे आहेत. देशमुख कुटुंबियांच्या सांगण्यावरून पैसे रोखमध्ये मिळाले होते आणि विविध कंपण्यांच्या माध्यमातून या ट्रस्टमध्ये डोनेशन म्हणून देण्यात आलेत.