1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2024 (08:57 IST)

बारामतीत आता सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया आणि अजित विरुद्ध युगेंद्र असा संघर्ष पाहायला मिळणार का?

राजकारणातली घराणेशाही, घराण्यातील सदस्यांमधलं द्वंद्व, एकमेकांच्या विरोधात उभं ठाकणं हे काही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अजिबात नवं नाही. पण ते विशेष तेव्हा ठरतं, जेव्हा घरण्यातलं द्वंद्व झाकून ठेऊन 'आम्ही सर्व एक आहोत' हे दाखवण्याचा सतत प्रयत्न होतो आणि तो सतत तोकडा पडत जातो.
 
महाराष्ट्रातल्या ठाकरे, मुंडे, भोसले, तटकरे, क्षीरसागर, निलंगेकर अशा अनेक राजकीय घरण्यांनी फूट पाहिली आहे. पण शरद पवारांच्या कुटुंबातली फूट ही अगदी अलीकडची आणि देश पातळीवर चर्चेचा विषय ठरली.
 
लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं त्याचा पहिला अंक संपूर्ण देशानं पाहिला. 'सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे' लढाईत सुप्रिया सुळे यांची सरशी झाली आहे. पण तरीही त्यावर मात करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला थेट राज्यसभेवर पाठवलं.
 
सुनेत्रा पवार राज्यसभेवर जात असल्यानं तांत्रिकदृष्ट्या बारामतीतून आता संसदेत तीन खासदार असतील. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि सुनेत्रा पवार.
 
सुनेत्रा पवार आणि शरद पवार जरी एकाच सभागृहाच्या सदस्या असल्या तरी त्यांचा खरा सामना हा सुप्रिया सुळे यांच्याशीच असल्याचं त्यांच्या राज्यसभेच्या नियुक्तीवरून दिसतं.
 
असं नसतं तर गेल्या अनेक वर्षांत त्यांच्या समोर राज्यसभेवर जाण्याच्या अनेक संधी होत्याच.
 
या पवार विरुद्ध पवार संघर्षाचा दुसरा अंक आता विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.त्याचं कारण ठरत आहेत ते युगेंद्र पवार.
 
विधानसभा निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. कार्यकर्तेही त्यांच्या उमेदवारीची मागणी करत आहेत.
युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. म्हणजेच युगेंद्र हे अजित पवार यांचे पुतणे आहेत.
 
युगेंद्र सध्या बारामतीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. जनता दरबार घेत आहेत. लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसंच, शरद पवारसुद्धा त्यांना त्यांच्या बरोबर घेऊन फिरत आहेत.
 
बारामतीत 'युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार' अशी लढत प्रत्यक्षात अवतरलीच, तर महाराष्ट्राला आणखी एका 'काका-पुतण्या'च्या राजकीय संघर्षाचा अध्याय पाहायला मिळेल. त्याची पूर्वपीठिका तशी युगेंद्र पवारांनी त्यांच्या काकू सुनेत्रा पवार यांच्याविरोधात प्रचार करून तयार करून ठेवलीच आहे.
 
'पवार विरुद्ध पवार' संघर्षाच्या पहिल्या अंकात 'अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा आणि दोन मुलं पार्थ आणि जय विरुद्ध उर्वरीत पवार कुटुंबीय' अशी लढत दिसली होती.
 
शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय, श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुंटुंबीय अशी बरीच मंडळी लोकसभेला अजित पवार यांच्याविरोधातल्या प्रचारात उतरली होती. हा अजित पवार यांना विरोध नसून काका शरद पवार यांना पाठिंबा आहे, असं त्यांच्या सर्वांकडून वारंवार सांगण्यात आलं होतं.
 
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला यांनी केलेला प्रचार निर्णायक ठरला होता. अजित पवार यांचा सख्खा भाऊसुद्धा त्यांच्याबरोबर नसल्याचा संदेश त्यातून मतदारांपर्यंत पोहोचला होता.
 
श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांचा हा प्रचार पुत्र युगेंद्र पवार यांच्या 'राजकीय पदार्पणा'ची तयारी असल्याची चर्चा सध्या बारामतीसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण लोकसभा निवडणुकांपर्यंत युगेंद्र पवार बारामतीतल्या राजकीय वर्तुळात अजिबात सक्रिय नव्हते. आता मात्र ते जोरदार सक्रिय झाले आहेत.
 
युगेंद्र पवार उच्चविद्याविभूषित आहेत, असं कौतुक त्यांची आत्या सुप्रिया सुळे यांनी अनेकदा केलीय. तसंच, ते आयोजित करत असलेल्या कुस्ती स्पर्धांचं सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे कौतुक केलं आहे.
याबाबत जेव्हा बीबीसी न्यूज मराठीनं युगेंद्र पवार यांच्याशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी त्यांच्या निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली नाही.
 
ते म्हणाले, “बारामतीमध्ये मी सक्रिय झालो तो निवडणुकीत आजोबांना (शरद पवारांना) मदत करण्यासाठी. त्यातून माझा कार्यकर्त्यांशी संपर्क झाला. त्यामधून या चर्चांना सुरुवात झाली आहे. मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यायचा असल्यास विचार करावा लागेल.”
 
बारामतीमधून रोहित पवार निवडणूक लढण्याचीदेखील शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
त्यावर युगेंद्र पवार म्हाणाले, “रोहित पवारांबाबत मात्र विरोधक काहीही पसरवत आहेत. ते माझे दादा आहेत. हा विरोधकांचा (राष्ट्रवादी अजित पवार गट) भांडणं लावण्याचा प्रयत्न दिसतो आहे.”
 
तिकडे अजित पवार गटानंसुद्धा बारामतीमध्ये आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बारामती विधानसभा निवडणूक अजित पवारच जिंकणार, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
 
तसंच, बारामतीमधून युगेंद्र पवार लढणार नाहीत. ते लढले तर हरतील, असा दावाही अजित पवार गटाकडून केला जात आहे.
 
अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी याबाबत बीबीसी न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं, “आम्ही संयमी आहोत. बारामतीत 2002 टक्के दादा लढणार आहेत. त्यांच्या विरोधात कोणीही लढलं तरी अजितदादांचा विजय निश्चित आहे. विकास कामं केली जात आहेत. दादांनी बारामतीचा विकास केला हे स्पष्ट आहे. लोकसभेलाच दादांना लोकांनी सांगितलं की, लोकसभेला जरी वेगळा विचार केला तरी विधानसभेला तुम्हांला मतदान करु.”
 
रोहित पवारांना चेकमेट करण्यासाठी युगेंद्र पवारांना पुढे करण्यात येत असल्याचा दावा यावेळी मिटकरी यांनी केला.
 
अजित पवारांनी विधानसभा निवडणूक गांभीर्यानं घेतली आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला त्यांची जास्त प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यासाठी त्यांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवून खासदार करणं आणि कदाचित मंत्रिपदही मिळवणं हे त्याचा भाग असल्याची चर्चा आहे.
 
केंद्रात मंत्रिपद असलं की निधी मिळतो. अजित पवार विधानसभेला कसलीही रिस्क घेणार नाहीत, असं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांना वाटतं.
तसंच, युगेंद्र पवार बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता त्यांना कमी वाटते. पण त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा घडवून आणून अजित पवारांशी माइंडगेम सुरू असल्याचं मेहता यांना वाटतं.
 
बीबीसी मराठीशी बोलताना मेहता सांगतात, “युगेंद्र पवारांच्या माध्यमातून नवा दादा असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत आहे. पण 'पवार विरुद्ध पवार' परत होणार नाही. शरद पवार असं न करुन आपल्यातला आणि अजित पवारांमधला फरक दाखवून देतील.
 
अर्थात, अजित पवारांना बारामतीत निवडून येणं अवघड नाही. पण त्यांच्याकडची बार्गेनिंग पॅावर कमी झाली आहे. पक्षांतर्गत नाराजी आहे. त्यांच्यासाठी ही आव्हानं आहेत. त्यांना नामोहरम करण्यासाठी शरद पवारांचा माईंड गेम सुरू आहे. ती संधी शरद पवार सोडणार नाहीत.”
 
...तर ठरतील निवडून आलेले सहावे पवार
युगेंद्र पवारांना बारामतीमधून तिकीट मिळतं की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच. त्यात ते खरंच निवडून आले तर लोकप्रतिनिधी झालेले ते सहावे पवार ठरतील. तसंच अनंतराव पवारांच्या कुटुंबातले तिसरे लोकप्रतिनिधी ठरतील.
 
पवार कुटुंबाची राजकीय वाटचाल ही शरद पावर यांच्या आई शारदाबाई पवार यांच्यापासून सुरू झाली आहे. शारदाबाई स्वतः त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून लोकल बोर्डावर निवडून आल्या होत्या. तिथून सुरू झालेली पवार कुटुंबाची राजकीय वाटचाल चौथ्या पिढीपर्यंत सुरू आहे.
 
त्यासाठी शरद पवार यांच्या कुटुंबाचे 'फॅमिली ट्री' समजून घेऊ या. शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांना 11 मुलं होती. त्यापैकी शरद पवार हे आठवं मूल.
 
शरद पवार स्वतः आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे सध्या खासदार आहेत. शिवाय शरद पवार यांचे बंधू दिनकरराव पवार यांचे पुत्र राजेंद्र पवार त्यांचा मुलगा रोहित पवार सध्या कर्जत-जामखेडमधून आमदार आहे.
 
शदर पवार यांचे आणखी एक भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार आहेत. त्यांची पत्नी सुनेत्रा पवार आता नुकत्याच राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या आहेत. शिवाय त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून खासदारकी लढवली होती. पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.
 
अनंतराव पवार यांचे दुसरे पुत्र आणि अजित पवार यांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार. याच श्रीनिवास पवारांच्या घरी अजित पवार यांनी तळ ठेकला होता जेव्हा पहाटेच्या शपथविधीनंतर मीडियाचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता. याच श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र सध्या बारामतीत सतत दौरे करत आहे आणि विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहे.
 
पवार कुटुंब आणि त्यांचा गोतावळा फार मोठा आहे. वेगवेगळे भाऊ आणि त्यांची मुलं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये आहेत. त्यापैकी प्रतापराव पवार आणि त्यांचे पुत्र अभिजीत पवार हे सकाळ माध्यम समूह चालवतात.
 
महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक बडं नाव दिवंगत शेकाप नेते एन. डी. पाटील. शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांचे ते पती होते.
 
राजकीय फूट पडल्यानंतर अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा आणि पुत्र जय आणि पार्थ एका बाजूला तर पवार कुटुंबातली राजकारणात असलेली इतर सर्व मंडळी दुसऱ्या बाजुला असं चित्र आहे.
 
पवार कुटुंबाच्या राजकारणात नसलेल्या सदस्यांपैकी श्रीनिवास पवार वगळता इतर कुणीही थेट आणि जाहीर भूमिका मात्र घेतलेली नाही.
 
Published By- Priya Dixit