शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (15:33 IST)

लहान मुलांना धोक्याची जाणीव कशी करुन द्याल?

family
- डेव्हिड रॉबसन
बाळ जन्मल्यावर त्यांना अगदी साध्या, मूलभूत धोक्यांविषयीही माहिती नसते. अनेक पालकांनी याचा अनुभव घेतला असेल.
 
मुलं जेव्हा रांगू लागतात तेव्हा ती पलंगाच्या कडेवरून स्वतःला बिनधास्त झोकून देतात. अभ्यासांती असे सूचित होते की, जेव्हा मूल त्याच्या परीघीय दृष्टीबद्दल शिकू लागते तेव्हा त्या अनुभवातून उंचीची भीती विकसित होते.
 
मूल स्वतंत्र हालचाल करू लागल्याच्या काही आठवड्यांनंतर त्यांच्यात भीतीच्या भावनेची लक्षणे दिसू लागतात. उदा. जेव्हा मूल जमिनीवर जोरात पडते तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात.
 
लहान मुलांना बहुधा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव व देहबोली पाहून धोका समजतो.
 
यूकेमधील सरे विद्यापीठातील ख्रिस ॲस्क्यू यांनी दाखवून दिले की, जेव्हा 8 वर्षांच्या मुलांना कांगारुसारख्या दिसणाऱ्या, पिल्लाला पिशवीत ठेवणाऱ्या प्राण्यांची चित्रे दाखवली. त्यापैकी एक चित्र क्वोलचे, दुसरे कोकाचे आणि तिसरे कसकस या प्राण्यांचे होते. या तिघांची जोडी घाबरलेल्या छायाचित्राशी, हसऱ्या छायाचित्राशी किंवा कसलेच छायाचित्र नसलेल्या फोटोशी केली होती.
 
पुढील चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, ज्या प्राण्याचे छायाचित्र घाबरलेल्या चेहऱ्याशी जोडलेले होते, त्याच्याविषयी मुलांना जास्त भीती वाटत होती आणि तो प्राणी असलेला खोका उघडण्यास ते तयार नव्हते. हे परिणाम दीर्घकालीन असतात.
 
एवढेच नव्हे तर या प्रसंगांनंतर पुढील अनेक महिने, त्या प्राण्यांशी संबंधित शब्दांचीही त्यांना भीती वाटत असते.
 
एखाद्या बाबतीत फक्त धोका माहीत असणे हे मुलाला सुरक्षित ठेवण्यास पुरेसे नसते. कारण त्या समस्येला कसा प्रतिसाद द्यावा हे अनेकदा मुलाच्या मेंदूला माहीत नसते. उदा. आपण 10 वर्षांचे होईपर्यंत आपली सर्व इंद्रिये एकत्रितपणे काम करत नाहीत. उदा. पाहणे आणि ऐकणे. म्हणजे कार किती वेगाने येत आहे हे समजणे कठीण असते.
 
लहान मुलांचा मेंदू सहज विचलित होतो. म्हणजे ते संभाव्य धोका विसरून जातात.
 
रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा पालकांना मुलांमध्ये बहुधा काही सवयी अंगी बाणविण्यास सांगितले जाते. म्हणजे रस्ता ओलांडताना डावीकडे पाहावे, मग उजवीकडे पाहावे किंवा सिग्नलवरील दिवा हिरवा होण्याची वाट पाहावी इत्यादी. याचा सराव केल्यावर ती सवय होते, जेणेकरून कालांतराने मूल त्याला आठवण करून न देताही ही कृती आपोआप करू लागते.
 
तारतम्यता वाढविणे
किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन करण्यात वेगळ्याच अडचणी असतात. किशोरवयीन मुलांच्या मेंदूत मोठे रचनात्मक बदल होत असतात.
 
त्यामुळे त्यांच्या डोपामाइन सिग्नलिंगची म्हणजे आनंदाशी जोडलेल्या न्यूरोट्रान्समिटरची संवेदनशीलता वाढलेली असते.
 
म्हणूनच जास्त डोपामाइनला चालना देणाऱ्या जोखीमयुक्त परिस्थितीमध्ये कुमारवयीन मुले लहान मुलांच्या तुलनेने अधिक सक्रिपणे सहभागी होतात.
 
पण जोखमीच्या मूल्यमापनाशी संबंधित आकलनप्रक्रियेची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांतून दिसून आले की, यामुळे असा निष्कर्ष काढणे म्हणजे मुलांवर अन्याय आहे. हा अभ्यास करताना
 
बहुधा जुगार खेळण्यास सांगण्यात येतो. उदा. त्यांना बहुरंगी स्पिनर दिला जातो. त्याच्या मध्यभागी बाण असतो. स्पिनर योग्य रंगावर थांबला तर त्यांना 10 डॉलर जिंकण्याची संधी असते. पण काहीच न जिंकण्याची शक्यताही 50 टक्के असते. किंवा ते खात्रीशीर 5 डॉलरची रक्कम घेऊन जाऊ शकतात.
 
किशोरवयीन मुले जोखीम पत्करतील असे वाटत होते. पण बहुतेक मुले खात्रीशीर उत्पन्नाचा पर्याय निवडतात. या उलट त्यांच्याहून लहान मुले जोखीम पत्करतात.
 
“जेव्हा आपण किशोरवयीन मुलांना जोखीम टाळण्याची संधी देतो तेव्हा ते लहान मुलांच्या तुलनेने सुरक्षित पर्यायाची निवड करतात.”, असे नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम विद्यापीठातील बालविकास व शिक्षण विभागातील सहाय्यक प्राध्यापक आयव्ही डेफो म्हणतात.
 
त्यांनी अलिकडेच किशोरवयीन मुलांच्या जोखीम घेण्याच्या वृत्तीवर प्रबंध सादर केला.
 
हे परिणाम पाहता डेफो यांनी निष्कर्ष काढला की, कुमारवयीन वा किशोरवयीन मुले ही बंडखोर असतीलच असे नाही. अनेकदा ते ज्या परिस्थितीत असतात, त्याचा तो परिणाम असतो.
 
जेव्हा ते पालकांपासून स्वतंत्र होतात. म्हणजे सतत त्यांचे पालक त्यांच्यावर लक्ष ठेवून नसतात तेव्हा अनुचित कृती करण्याच्या त्यांना अनेक संधी असतात. उदा. दुकानातून चोरी करणे, बेकायदेशीर अमली पदार्थाच्या विळख्यात जाणे, गुंडांमध्ये सहभागी होणे किंवा असुरक्षित संभोग करणे किंवा बाइकवरून त्यांच्या मित्रांशी शर्यती लावणे इ.
 
“किशोरवयात आणि प्रौढ होण्याच्या पायरीवर असताना जोखीम घेण्यास अनुकूल परिस्थिती समोर येण्याचे प्रमाण खूप वाढलेले असते. आणि काही वेळा ती प्रलोभने टाळणे कठीण झालेले असते.”, असे डेफो सांगतात.