बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (00:19 IST)

श्रीक्षेत्र माहुरगड

नांदेडपासून 140 कि. मी. अंतरावर असलेले महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे श्रीक्षेत्र माहुर. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पिठापैकी माहूर हे एक मुख्य पीठ आहे. हे श्री रेणुकादेवी जगदंबेचे ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून 2 हजार 600 फूट उंचीवर असलेल्या दोन शिखरांच्या टोकावर श्री दत्तात्रय आणि रेणुकादेवीचे स्थान आहे.
 
येथील पर्वत रांगेत काही जैन लेणीही आढळतात. माहूर किल्ल्याचे प्रवेशव्दार हत्ती दरवाजा म्हणून ओळखले जाते. किल्ल्याभोवती धन बुरूज, निशानी बुरूज आणि महाकाय बुरुज आहेत. किल्ल्यावर ब्रम्हतिर्थ नावाने ओळखले जाणारे मोठे जलाशय आहे. या किल्ल्याला पैनगंगा खोर्‍यावर नियंत्रण करण्याच्यादृष्टीने ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला राजगड किल्ला जवळच्या पाच किलोमीटर परिसरात विस्तीर्ण पसरलेला आढळतो. किल्ल्याची भक्कम तटबंदी आजही पाहायला मिळते. माहूरला सोनपीर दर्गादेखील आहे. माहूरभोवती दाट वन असून त्यात वन्य प्राणी आढळतात. गडाच्या परिसरात माता अनुसूया आणि परशुरामाचेही मंदीर आहे.
 
दरवर्षी नवरात्रात व दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. वार्षिक महोत्सवासाठी येथे सर्व धर्म व पंथाचे लोक मोठ्या संख्येने येतात. दररोज हजारो भाविकांची येथे वर्दळ असते. पावसाळ्यात गडाभोवतीचा हिरवागार परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. येथील दत्तशिखर आणि देवदेवेश्वर हे महानुभवांचे प्रसिध्द स्थळ आहेत. अभिरुषीतिर्थ, काजलतिर्थ, मातृतिर्थ आणि रामतिर्थ ही इतर पवित्र स्थळे या परिसरात आहेत. गडावरील मध्ययुगीन ऐतिहासिक स्थानामध्ये राणी महल, खुदाबंदखान दर्गा, मस्जिद आणि दिवाण-ए-खास सभागृह आहे. फरीद शाही दर्गा आणि गडावरील धबधब्यालादेखील मध्ययुगीन ऐतिहासिक वारसा आहे.
 
माहूर ही गोंडांच्या आदिवासी राज्याची राजधानी होती. पुराणकाळातील परशुरामाच्या कथा या भागात प्रचलित आहेत. ऋषीमुनींची तपोभूमी म्हणूनही माहूरचे प्राचीन काळापासून महत्त्व आहे. अत्यंत प्राचीन काळापासून येथे मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. सातव्या शतकातील वाकाटकांच्या काळातील पांडवलेण्यांचे सौंदर्यही येथे पाहावयास मिळते. येथील गुंफा मोठ्या आकाराच्या आहेत.
 
पावित्र्य आणि नैसर्गिक सौंदर्याचे अनोखे मिश्रण माहूरगडावर पाहायला मिळते. येथील धार्मिक पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक पर्यटनालाही महत्त्व येत आहे. अभ्यासकांच्यादृष्टीने हा परिसर महत्त्वाचा आहे. गडावर देवीचे दर्शन घेतांना विड्याचा प्रसाद आणि सोबत गावात मिळणार्‍या पुरणपोळीच्या नैवेद्याची चवही येणार्‍या भाविकांसाठी विशेष अशीच असते. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी माहूरला एकदा तरी जायलाच हवे.