निराशेतून आशेच्या हिंदोळ्यावर क्रिकेट
वेस्ट इंडीजमधील विश्वकरंडक स्पर्धेतील अत्यंत खराब कामगिरी ते दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धतील ऐतिहासिक विजय...अशा दोन टोकांमध्ये भारतीय क्रिकेट या वर्षी झुलले. आत्यंतिक निराशेनंतर आलेले आनंदपर्व भारतीयांनी इतक्या दणक्यात साजरे केले की या रसिकांनी विश्वकरंडकातील पराभवानंतर याच क्रिकेटपटूंची गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढली होती, हेही विसरायला झालं.भारतीय क्रिकेटमध्ये यावर्षी अशा काही घटना घडल्या की त्याचा परिणाम भविष्यातील क्रिकेटवर नक्कीच होतील. भारतीय क्रिकेट मंडळ याही वर्षी आपल्या धक्कादायक कारभारामुळे चर्चेत राहिले. मंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयाचा परिणाम आगामी काळात होतील. इंडियन क्रिकेट लीगमध्ये (आयसीएल) सामील होणार्या खेळांडूवर घातलेली बंदी व खेळांडूचे तोंड बंद ठेवण्यासाठी आणि निवड समितीच्या सदस्यांना वृत्तपत्रात स्तंभलेखनावर बंदी घालणारा आदेश खूप दिवस चर्चेत राहीला.काही वेळा मंडळाला माघार घ्यावी लागली. त्यामध्ये प्रशिक्षकाच्या निवडीचा मुद्दा समाविष्ट आहे. ग्रेग चॅपेल यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी निवडल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅहम फोर्डने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ऑफर लाथाडली होती. मग दक्षिण आफ्रीकेच्या गॅरी कर्स्टनची नियुक्ती करण्यात आली.यापूर्वी जानेवारीत न्यूझीलंडमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून तिसर्या व अंतिम कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र बांगलादेश व इंग्लंडला त्यांच्या मायदेशात 1-0 ने हरवून कसोटी मालिका जिंकली तर पाकिस्तानला 27 वर्षानंतर कसोटी मालिकेत 1-0 ने हरविले.एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वकरंडक स्पर्धा, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून झालेले पराभव वगळले तर भारताची कामगिरी चांगलीच झाली आहे. यादरम्यान बांगलादेश, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानकडून मालिका जिंकली. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 3-4 असा भारताचा काठावर पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 4-2 ने पराभव केला.
वेस्ट इंडीजमध्ये भारतीय क्रिकेटवर लागलेला डाग धोनीसेनेने दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-20 विश्वकरंडक जिंकून पुसून टाकला. सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड आणि सौरभ गांगुली हे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत न खेळल्यामुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य आता युवा खेळांडूच्या हातात सुरक्षित असल्याचे म्हटले जाऊ लागले.
धोनीच्या संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानसारख्या दिग्गज संघाला हरवून पहिला विश्वकरंडक पटकावला. 1983 नंतर प्रथमच भारताने विश्वकरंडक जिंकला. भारतीय संघ मायदेशात परतल्यावर मुंबईमध्ये त्यांचे शाही स्वागत झाले. त्याचे ध्वनी परदेशातही उमटले. भारतीय रसिकांचे क्रिकेटप्रेम किती आहे हेच यातून दिसून आले.