अनिवासी भारतीयांचा सरत्या वर्षावर ठसा
सरत्या वर्षात अनिवासी भारतीयांनी देखिल जागतिक पातळीवर ठसा उमटवला. राजकारण असो की व्यापार, चित्रपट असो की अवकाश कोणतेही क्षेत्र भारतीयांच्या प्रभावापासून मुक्त राहिले नाही. अशाच काही अनिवासी भारतीयांच्या कर्तृत्वाचा हा वेध.... सुनीता विल्यम्स १९ सप्टेंबर १९६५ ला ओहियो येथे जन्म झालेली सुनीता विल्यम्स कल्पना चावलानंतर अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला आहे. मिशन एसटीएस-११६ मध्ये बसून १४ सहकाऱ्यांच्या साथीने सुनीताने १० डिसेंबर २००६ ला अवकाशात उड्डाण केले. त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे २२ जून २००७ ला ती पृथ्वीवर परतली. या काळात तिने तीनवेळा स्पेस वॉक केला. १९५ दिवस अंतराळात रहाताना सुनीताने सर्वांत जास्त काळ तेथे राहण्याचा विक्रमही केला. बॉबी जिंदालअमेरिकेच्या लुझियाना प्रांताचे गव्हर्नर बनण्याचा मान यंदा भारतीय वंशाच्या बॉबी जिंदाल यांनी मिळविला. भारतीय वंशाचा व्यक्ती प्रथमच अमेरिकेत या पदावर जाऊन पोहोचला आहे. वीस ऑक्टोबर २००७ ला गव्हर्नरपदासाठी त्यांची निवड झाली. बॉबी १४ जानेवारी २००८ ला पदाची शपथ घेणार आहेत.