गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मागोवा-२००७
Written By वेबदुनिया|

ट्वेंटी-२० तील शंभर टक्के विजेतेपद

NDND
भारतीय क्रिकेटसाठी २००७ हे वर्ष संस्मरणीय असे गेले. १९८३ नंतर विश्वकरंडक जिंकण्यात संघाला यश आले नव्हते. मागच्या वेळी विश्वकरंडाकाच्या अंतिम फेरीत धडक मारूनही शेवटी हारच पदरी पडली होती. यावर्षी तर दुसऱ्या फेरीतही संघ जाऊ शकला नाही. ही मानहानी असताना पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ पाठवला गेला. त्यात एकही बडा खेळाडू नव्हता. कर्णधारपदही नवख्या महेंद्रसिंह धोनीकडे सोपविले होते. आता हा काय करणार याकडे लक्ष लागले असताना नव्या प्रकारच्या खेळाचा भारतीय संघ चक्क सरताज ठरला. बड्या बड्या संघांना पाणी पाजून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि अंतिम फेरीत तर काय चक्क पाकिस्तान. पारंपरिक प्रतिस्पर्धी. पण भारताच्या विजयरथाने पाकिस्तानलाही चिरडले आणि विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. या स्वप्नवत प्रवासाचा हा मागोवा.......


ट्वेंटी-20 विश्वकरंडकात उतरण्यापूर्वी भारताला अशा प्रकारच्या फक्त एकाच सामन्याचा अनुभव होता. पण तरीही अननुभव आड येऊ न देता भारताने करंडक जिंकण्यापर्यंतचा प्रवास अगदी स्वप्नवत केला.

या स्पर्धेत भारताची सांघिक कामगिरी चांगली झाली. एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहून विश्वकरंडक जिंकता येत नाही. त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न गरजेचे असतात. हेच याही वेळी अधोरेखित झाले. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील नायक वेगळा होता. म्हणूनच स्टार खेळाडू नसतानाही भारत करंडक जिंकला.

युवराजसिंह, वीरेंद्र सेहवाग, आर. पी. सिंह, श्रीशांत, कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रॉबीन उत्थप्पा, रोहित शर्मा या सर्वांनी मोक्याच्या वेळी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.

ड गटातील स्कॉटलंडविरूद्धचा भारताचा पहिला सामना पावसात वाहून गेला. त्यानंतरचे सर्व सामने भारतासाठी करा किंवा मरा स्थितीतलेच होते. सुपर आठमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला हरविणे गरजेचे होते.

पण कमी फरकाने हरला असता तरी नेट रन रेटच्या आधारे भारत सुपर आठमध्ये पोहोचू शकला असता. पण याही अतिशय़ चित्तथरारक सामन्यात पाकिस्तानने बरोबरी साधली. पण बॉलआऊटमध्ये भारताने पाकला 3-0 ने नमवले.

सुपर आठमधील पहिल्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून दहा धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इंग्लंड व दक्षिण आफ्रिका हे दोन बडे संघ भारतापुढे होते.

WDWD
इंग्लंडविरूद्धच्या सामन्याचा हिरो युवराजसिंह झाला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारले. अवघ्या बारा चेंडूत अर्धशतक फटकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वांत वेगवान अर्धशतक आहे. गोलंदाजांनी अंतिम षटकांमध्ये अतिशय अचूक टप्प्यावर योग्य दिशा राखून गोलंदाजी केली. त्यामुळे भारताला अठरा धावांनी विजय मिळाला.

उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताला दक्षिण आफ्रिकेला हरविणे गरजेचे होते. पण या सामन्याचे दुर्देव म्हणजे मागच्या सामन्याचा हिरो युवराज दुखापतीमुळे यावेळी खेळू शकला नाही. त्यातच यजमान संघाने सुरवातीलाच चार चेंडूत भारताच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठविले. पण रोहित शर्मा या युवा फलंदाजाने चाळीस चेंडूत पन्नास धावा काढून संघाला 153 या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

यानंतर रूद्रप्रतापसिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभवच केला असे नाही, तर यजमानांना चक्क स्पर्धेबाहेरही ढकलले.

उपांत्य फेरीत भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होती. भारताची विजय यात्रा आता संपली असेच जणू सर्वजण धरून चालले होते. एकदिवसीय सामन्याती विश्वविजेता ऑस्ट्रेलिया भारताला चीत करणार असेच वाटत होते. पण धोनीच्या संघाने चमत्कार घडविला. ऑस्ट्रेलियाला पंधरा धावांनी हरवून त्यांना मायदेशी पाठविले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात युवराजने पुन्हा एकदा जोरदार खेळी करताना पाच चौकार व पाच षटकारांच्या सहाय्याने तीस चेंडूतच सत्तर धावा कुटल्या. गोलंदाजीच श्रीशांतने चमक दाखविताना चार षटकात केवळ बारा धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठविले.

अंतिम फेरीत भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडली. आशियाई वाघांच्या या मुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करून ट्वेंटी ट्वेंटीचा पहिला विश्वकरंडक आपल्या नावे केला.