बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मागोवा-२००७
Written By वेबदुनिया|

'भेजा फ्राय' चित्रपटांचा यंदाही 'ब्लॅक फ्रायडे'

IFMIFM
चित्रपट हे स्वप्नरंजनाचे माध्यम असल्याचा समज करून देणाऱ्या काळातही वर्तमानाचे बोट धरून चालणारेही काही चित्रपट येत आहेत. सरत्या वर्षातही असे काही चित्रपट येऊन गेले. त्यांनी आजूबाजूच्या वास्तवावर बोट ठेवताना त्याचे अस्वस्थ करणारे रूपही लोकांपुढे मांडले. पण भेजा फ्राय करणाऱ्या या चित्रपटांचा ब्लॅक फ्रायडे यंदाही काही टळला नाही.

IFMIFM
बिमल रॉय आणि ह्रषिकेश मुखर्जी यांच्यानंतर हिंदी चित्रपट प्रामुख्याने दोन श्रेणीत विभागला जातो. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट. पण गेल्या काही वर्षात या दोहोतील भेदही काहीसा कमी होऊ लागला आहे. काही दिग्दर्शक कला व व्यावसायिकतेचा संगम करून चित्रपट काढत आहेत. त्याचवेळी निखळ कलात्मक म्हणून (म्हणजे काही लोकांपुरते मर्यादीत राहणारे व न चालणारे) चित्रपट अगदी अल्प प्रमाणात येत आहेत. बाकी व्यावसायिक सिनेमा म्हणजे वास्तवाशी नाते तोडलेले चित्रपट म्हणूनच उरले आहेत. म्हणूनच अशा परिस्थितीत वेगळी वाट चोखाळणाऱ्या चित्रपटांची दखल घ्यावीच लागते.

IFMIFM
भेजा फ्राय, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., मेट्रो, चीन कम, परझानिया, ब्लॅक फ्रायडे हे त्यातील काही चित्रपट. पण याची सुरवात २६ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या परझानियाने केली. राहूल ढोलकिया याचा हा चित्रपट गुजरात दंगलीवर आधारीत होता. या दंगलीत आपला मुलगा गमावलेल्या पारशी कुटुंबाची ही संवेदनशील कहाणी अतिशय चांगली मांडली होती. तत्कालीन राज्यकर्त्यांचा आणि हिंदूत्ववाद्यांचा उन्माद मांडताना चित्रपट लाऊडही झाला नाही. त्यामुळेच तो लक्षात रहाणारा ठरला. अर्थातच तो चित्रपट फारच मर्यादीत प्रेक्षकांनी पाहिला. गुजरातमध्ये तर त्यावर बंदीची भाषाही बोलली गेली. पण समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले.

पण वर्षातील चांगला ऑफ बीट चित्रपट म्हणायचा झाल्यास ब्लॅक फ्रायडेचे नाव घ्यावे लागेल. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट मुंबई बॉम्बस्फोटावर आधारीत होता. या चित्रपटाची डॉक्युमेंटरी होण्याचा धोका होता, पण अनुरागने चित्रपट असा काही हाताळला आहे, की वास्तवाचे दूसरे रूप हा चित्रपट वाटतो. बॉम्बस्फोटाच्या कटापासून त्याच्या आरोपींच्या शोधापर्यंतचा सगळा प्रवास खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. शिवाय चित्रपट हे सगळे दाखवून या साऱ्याची कारणे सांगताना भाष्यही करून जातो. ही कारणे पटोत न पटोत पण चित्रपटाची दखल मात्र घ्यावी लागते. यात मुंबईचे तत्कालीन सहआयुक्त राकेश मारीया यांची के. के. मेनन याने वठवलेले भूमिका लाजवाब होती.
IFMIFM
मीरा नायर व दीपा मेहता या अनिवासी भारतीय दिग्दर्शकांचे नेहमी वेगळ्या पठडीत असणारे चित्रपट याही वर्षी आले अपेक्षेप्रमाणे दीपा मेहता यांचा वॉटर हा चित्रपटही यंदा वादाचे मोहोळ उठवून गेला. शेवटी हिंदूत्ववाद्यांच्या तीव्र विरोधातमुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालाच नाही. तिच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत वॉटर तितकासा चांगला नव्हता, अशी चर्चा होती. मीरा नायरचा यंदा प्रदर्शित झालेला नेमसेक हा चित्रपट झुंपा लाहिरीच्याच कादंबरीवर आधारीत होता. सलाम बॉम्बेनंतर मीराने एवढा चांगला चित्रपट दिल्याची समीक्षकांत चर्चा होती.

IFMIFM
गौतम घोष यांचा यात्रा हाही या वर्षी प्रदर्शित झालेला वेगळा चित्रपट. याशिवाय ऐश्वर्या राय अभिनीत प्रोव्होक्डही चर्चेत होता. पण त्याला बाहेरच जो काही मिळायचा तो प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने ऐश्वर्याच्या नावावर बाहेरचा एक चित्रपट लागला. महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट बनविण्याचा मोह अजूनही अनेकांना आवरत नाही. यंदा अनिल कपूरचे नाव त्यात घ्यायला हवे. अनिलच्या कंपनीतर्फे गांधी माय फादर हा चित्रपट यंदा प्रदर्शित झाला. महात्मा गांधी व त्यांचा मुलगा देवदास यांच्यातील तणावाचे संबंध ही चित्रपटाची कथावस्तू. देवदासची भूमिका अक्षय खन्नाने केली होती. पण चित्रपट लोकांना फारसा आवडला नाही.

विशाल भारद्वाज व मधुर भांडारकर यांनी व्यावसयिक व कलात्मक चित्रपट यांचा चांगला मेळ घातला आहे. त्यामुळे एकावेळी दोन्ही प्रकारचे वाटावेत असे चित्रपट ते तयार करतात. पण याच प्रयत्नातील मधुरचा ट्रॅफिक सिग्नल यंदा व्यावासयिकदृष्ट्या फसला. वास्तविक चित्रपट चांगला होता. तीच कथा भारद्वाजच्या ब्ल्यू अंब्रेलाची.

IFMIFM
याशिवाय यंदा रिमा कागदी यांचा हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि. हा खुसखुशीत चित्रपट हसू उमटवून गेला. भेजा फ्राय हा सागर बेल्लारी यांचा चित्रपट म्हणजे पडद्यावर केलेले छानसे नाटक होते. ते व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही ठरले. चिनी कम हा शहरी भागात पाहिला गेला. पण साठ वर्षाच्या म्हाताऱ्याने पस्तीस वर्षाच्या मुलीशी लग्न करण्याचे वास्तव(?) समाज पचवू शकला नाही. याशिवाय सुधीर मिश्रा यांचा गुरूदत्त व वहिदा रहमान यांच्या नातेसंबंधांवर आधारीत खोया खोया चांद या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला. पण त्याने लगेचच मान टाकली. पण चित्रपटाची गाणी छान होती.

एकूणात काय ऑफ बीट चित्रपटांना जाण्याचे धाडस काही ठरावीक लोकांनीच केले. त्यामुळे हे चित्रपट न चालण्याची रड काही प्रमाणात कायम राहिली. पण तरीही त्यात कलात्मकरित्या जमलेले व व्यावसायिक समीकरणांना पुरे पडणारे चित्रपट चालले.