मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By अभिनय कुलकर्णी|

आपली माती, आपलीच माणसं!

२००८ या वर्षाने सरता सरता महाराष्ट्राच्या पटलावर अनेक राजकीय वादळे उठवली. या वादळांनी 'राज'सत्ता तर हादरवलीच, शिवाय अनेकांवर 'प्रहार'ही केले. रा्ज्याची 'देशमुखी' विलासरावांना सोडावी लागली आणि ती नकळत चालत चालत 'अशोकरावांच्या' गळी पडली. तिकडे 'आरार' आबांना त्यांच्याच 'पॉवरबाज' साहेबांनी थांबायला लावलं आणि 'ओबीसी' अशी नवी बाराखडी लिहू पाहणार्‍या छगनरावांच्या आणि पर्यायाने 'राष्ट्रवादी'च्या भुजांत बळ भरले. तिकडे उद्धव आणि राज यांच्या 'भाऊबंदकी' या नाटकाचा प्रयोग या वर्षीही रंगला. 'मराठी मुद्याचे'चे प्रॉपर्टी राईट्स अर्थात स्थावर हक्क आपल्याकडेच, असल्याचे सांगून 'मी मराठी, मी मराठी' हे पद दोघेही शिरा ताणून गात असल्याने हे पद आणि 'नाटकही' पुढे सरकायला तयार नाही. गोपीनाथांच्या बंडाने अनेकांच्या 'मुंड्या' त्यांच्याकडे वळाल्या. त्यातच तेही 'ओबीसी' ही नवी बाराखडी गिरवायला लागल्याने 'मिटता कमलदल' अशी अवस्था झाली होती. पण पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर कमळाच्या पाकळ्या उमलल्या आणि सर्वत्र 'प्रमोद' जाहला. आता बघूया पुढच्या वर्षी यापैकी कोण किती महत्त्वाचा ठरतो ते? 'आफ्टरऑल' पुढच्या वर्षी अंगण आणि ओसरीतही निवडणुका आहेत, महाराजा. शड्डू ठोकून आव्हान देणार्‍या या मंडळीतील कोणाची पाठ मातीला लागणार नि कोण वरचढ ठरणार (पुढील फक्त पाच वर्षासाठी हं!) हे याच वर्षी ठरणार. मग बघूया कुणाच्या दंडाची बेटकुळी किती फुगतेय ते.

Gajanan GhuryeGG
विलासराव देशमुख- 'म्हाराष्ट्राचे' सर्वाधिक काळ मुख्यमंत्री ठरलेल्या विलासरावांची 'देशमुखी' संपली तरी महत्त्व काही संपलेले नाही. भलेही मुख्यमंत्रिपद गमावले तरी त्यांचे सोनियांवर असे काही गारूड केलेय की अशोकरावांच्या काठीने 'मान हलवत हलवत' या गारूड्याने नारायण राणे नावाचा सतत फुत्कार करणारा साप किमान दूर केला आहे. त्याचवेळी उद्या यदाकदाचित राज्यात कॉंग्रेस आघाडीची सत्ता आली तरी मुख्यमंत्रिपदाचा 'क्लेम' पहिल्यांदा त्यांचाच असू शकतो. कारण अशोकरावांपेक्षा मोठा 'मासबेस' त्यांना नक्कीच आहे. शिवाय साडेचार वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या जोरावर सत्ता पुन्हा आली असा 'कांगावा'ही करून ते अशोकराव, नारायणराव, सुशीलकुमार, पतंगराव यांच्यासह पक्षातल्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या अनेक संभाव्य, गुप्त, प्रकट दावेदारांना मागे सारून पुढे येऊ शकतात.
'प्रोव्हायडेड'- हा प्रश्न सत्ता आल्यानंतरचा आहे. त्यामुळे....

NDND
अशोक चव्हाण- अशोकरावांना 'मुख्यमंत्रिपदाची' लॉटरी अर्थातच अचानकपणे लागली असली तरी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने त्यांना 'टिडीएस' भरावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा आनंद मानावा की 'टिडीएस'चे दुःख करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दहा वर्षे सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस आघाडीची सत्ता पुन्हा येण्याची शक्यता कमीच दिसतेय. त्यामुळे निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यास त्याचे खापर आपल्याच भाळी फुटून पुढच्या राजकीय कारकिर्दीचे तीनतेरा वाजण्याची नौबत या शंकरराव पुत्राच्या नशिबी नाही आली म्हणजे मिळवली. बाकी विलासरावांनी जाता जाता नारायण राणे आणि अशोकरावांचाही छान 'गेम' केला.

Gajanan GhuryeGG
नारायण राणे- स्वपक्षीयांवर त्यातही प्रामुख्याने विलासरावांवर 'प्रहार' करण्यात नारायणरावांची कॉंग्रेसमधली जेवढी होती तेवढी हयात गेली. आणि या प्रहारातच शेवटचा 'प्रहार' स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून केला. आता निलंबित झाल्यावर काय करणार हा प्रश्नच आहे. सोनियाचरणी धाव घेऊन जुळवाजुळव केली तर हा भांडकुदळ मालवणी माणून सत्तेसाठी 'वाकला' असा प्रचार व्हायचा. बरं, माघारी येऊ नये म्हणून बाळासाहेबांचा वाघही दारापाशीच गुरगुरत बसला आहे. मध्येच हत्तीवर स्वार व्हायच्या अफवाही येतात. पण हत्तीचा मद यांच्यापाशीही स्वतंत्रपणे आहे. त्यामुळे दोन्ही हत्तींची परस्परांशी जुंपली तर वेगळेच महाभारत घडायचे. कधी कधी तर धाकट्या युवराजांच्या पक्षात जाण्याची वार्ताही कानी येते. पण 'मनसे' काहीही व्यक्त होत नाही. 'राष्ट्रवादी'त बडेबडे ह्त्ती असल्याने तिथे गेल्यास या हत्तींशीच त्यांची जुंपायची. त्यामुळे आता स्वतंत्र पक्ष काढणे हाच पर्याय सध्या तरी समोर आहे. पण त्याला कितपत यश मिळेल हे सांगणे अवघड. त्यात यांचा हत्ती कोकणात रोरावतपणे फिरेल, उर्वरित राज्याचे काय?

PRPR
आर. आर. पाटील- मुंबई बॉम्बस्फोटानंतर गेलेल्या राजकीय बळीत आर. आर. पाटील यांचे नाव आल्यानंतर 'आरार' असे दुःखोद्गार नक्कीच निघाले. कर्तृत्ववान आणि चांगली प्रतिमा असलेल्या आबांना अचानक उगाचच हिंदी बोलण्याची उबळ यावी काय नि नको ते तोंडातून निघावे काय आणि यातच त्यांचे मंत्रिपद जाते काय? सगळेच अनाकलनीय. पण चांगला 'मासबेस' असलेल्या या नेत्याची पुढची वाटचाल जोरदार असेल. म्हणूनच 'राष्ट्रवादी'ने प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देऊन या मुलुखमैदान तोफेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरवले आहे. पण प्रश्न इतकाच आहे, कॉंग्रेसच्या निष्क्रियतेचे खापर 'राष्ट्रवादी'वर फुटून सत्ता आघाडीकडे आलीच नाही तर....?






Gajanan GhuryeGG
छगन भुजबळ- यांच्या सरकारच्या काळातच पहिलीपासून 'एबीसी'ची बाराखडी शिकवायचा निर्णय झाला. मग यांनीही 'ओबीसी'ची नवी बाराखडी आधी महाराष्ट्रात मग देशात गिरवून 'समता' निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या नव्या प्रयत्नांकडे साहेबांचे लक्ष गेल्यानंतर ही बाराखडी परीक्षेत आल्यास आपणच नापास होऊ या भीतीने त्यांनीच या छगनरावांच्या भुजात उपमुख्यमंत्रिपदाचे बळ भरले आणि आपण मागे केलेली चुक दुरूस्त केली. एकेकाळचा हा वाघ आता फारसा गुरकावत नसला तरी त्याची ताकदही काही दुर्लक्षिण्याजोगी नाही. म्हणूनच आगामी निवडणुकांत हा वाघ पक्षाच्या भुजांतही नक्कीच बळ भरू शकतो.

Gajanan GhuryeGG
गोपीनाथ मुंडे- कुणी लक्षच देत नाही म्हटल्यावर या गोपीनाथाने कमलदलाच्या पाकळ्या 'मिटवायची' तयारी केली होती. त्यातच 'ओबीसीची' बाराखडी गिरविण्याचे 'भुजबळ' यांच्यातही आले होते. या वार्तेने कमलदल शतशः विदीर्ण व्हायचेच तेवढे बाकी राहिले. दिल्लीत बसलेल्या पक्षातील 'महाजनांना' या 'धनगरराजाची' राजकीय ताकद लक्षात आल्यानंतर राज्यातले सगळे 'गडकरी' यांच्या छत्राखाली एकत्र आणण्यात आले. मग कुठे विविध 'जातीच्या' कमळांचा 'संघ' पुन्हा फुलायला लागला. आगामी काळात निवडणुकांत युतीचे राज्य आल्यानंतर गोपीनाथरावांना अगदी गेलाबाजार उपमुख्यमंत्रिपदाची तरी संधी आहेच. तशी त्यांची नजर मुख्यमंत्रिपदावर आहे. पण जागा कोणालाही कितीही मिळाल्या तरी मुख्यमंत्री आमचाच असे तर्कट उद्धवरावांनी लढविल्याने गोपीनाथरावांची ती अपेक्षा पूर्ण होण्याची संधी तशी कमीच आहे. उपमुख्यमंत्री कम गृहमंत्री झाल्यावर कोणता प्रकल्प अरबी समुद्रात बुडवतात आणि कुणाला मुसक्या धरून आणतात ते पहायचे.

PRPR
उद्धव ठाकरे- 'यावच्चंद्रौदिवाकरौ' मराठीचा मुद्दा आमचाच, असे उद्धवरावांचे म्हणणे आहे. ('प्रोव्हायडेड'- हिंदू जगला तर मराठी माणूस जगेल.) म्हणून आधी हिंदूत्व मग मराठीत्व असा उद्धवरावांचा पर्यायाने बाळासाहेबांचा आणि पर्यायाने शिवसेनेचा नारा आहे. (यापुढे कुठेही बाळासाहेबांचा शब्द अंतिम या शब्दसमूहाजागी जागी 'उद्धवराव' असे वाचावे.) आगामी निवडणुकीत उद्धवरावांच्या वाघाची डरकाळी पूर्ण महाराष्ट्रभर जाण्याची संधी आहे. कारण कॉंग्रेसने तशी सोयच आपल्या 'जंगलराज्यात' करून ठेवलीय. फक्त मराठी आणि हिंदूत्व यांच्या आट्यापाट्या खेळताना अधेमधे कुणी येऊन नये एवढीच त्यांची 'मनसे' अपेक्षा आहे. बाकी ते मुख्यमंत्री होणार की नाही या प्रश्नाचे उत्तर बाळासाहेब आणि अर्थातच पर्यायाने उद्धवराव हेच स्वतः घेण्याची शक्यता आहे. कारण सध्या तरी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्याशिवाय दुसरा कोणता उमेदवार त्यांच्याकडे नाही.

NDND
राज ठाकरे- 'धाकटे युवराज', मराठी ह्रदयसम्राट, महाराष्ट्राचे तेजतर्रार युवा नेते राज ठाकरे यांच्यासाठी पुढची निवडणुक महत्त्वाची आहे. खरं तर खूप खपून 'मराठमोळा' पुरणपोळीचा बेत केलेला असावा. मग छानपैकी जेवायला बसावे आणि मग तो हात तोंडापर्यंत न्यावा आणि तोच माशी पडावी. असे काहीसे झाले. मराठीचा मुद्दा मस्तपैकी जमून आलेला असताना, निवडणुका समोर दिसत असताना मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा मक्षिकापात झाला नि जमवून आणलेली पाककृती पार बिघडून गेली. आता मराठी माणूस महत्त्वाचा की देश असा प्रश्न उद्भवल्यास सहाजिकच कुणीही देशालाच प्राधान्य देईल, पण मग मराठी माणसाचे काय होणार? पण तरीही निवडणुकांत हा मुद्दा कुठे ना कुठे येणारच. किमानपक्षी मातृपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पायात खोडा घालण्याइतपत तरी हा मुद्दा चालणारच. त्यामुळे आगामी निवडणुकांत सत्तेचा त्रिकोण, चौकोन, पंचकोन झाल्यानंतर राज ठाकरे नक्कीच महत्त्वाचे ठरणार हे अगदी नक्की.

आपल्या मातीतली ही सगळी आपली माणसं. हीच माणसं, आता नववर्षातील निवडणुकांच्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येणार. त्यावेळी 'आपली मती आणि आपलं मानस' जाणून घेऊन योग्य मतदान करा. बस्स. एवढंच काय ते सांगणं, महाराजा.
इति लेखनसीमा.